खरीप हंगाम 2026-27 साठी MSP वाढीची घोषणा, शेतकऱ्यांना दिलासा की निवडणुकीपूर्वीचा मास्टरस्ट्रोक?
धान्य, तेलबिया आणि भरड धान्यांना मोठा आधार केंद्र सरकारची MSP वर मोठी घोषणा
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
केंद्र सरकारने खरीप विपणन हंगाम 2026-27 साठी किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. धान (सामान्य) पासून सूर्यफूल, तीळ आणि नाचणीपर्यंत विविध पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली असून, सरकारने “शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा निर्धार” पुन्हा अधोरेखित केला आहे.
सरकारच्या घोषणेनुसार, सामान्य धानाचा MSP प्रतिक्विंटल ₹2441 करण्यात आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत ₹72 ची वाढ करण्यात आली आहे. तेलबिया पिकांमध्ये सूर्यफूलाला सर्वाधिक ₹622 प्रति क्विंटल वाढ देण्यात आली आहे. तर सर्वाधिक MSP तीळ पिकाला मिळाला असून तो ₹10,346 प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने दावा केला आहे की, बहुतांश खरीप पिकांमध्ये उत्पादन खर्चाच्या A2+FL निकषावर किमान 50 टक्के नफा दिला जात आहे. काही पिकांमध्ये, विशेषतः मूगमध्ये, हा नफा 61 टक्क्यांपर्यंत पोहोचत असल्याचेही सांगण्यात आले.
याशिवाय, खरीप हंगाम 2026-27 साठी सरकारी खरेदीवरील अंदाजित खर्च तब्बल ₹2.60 लाख कोटी इतका राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नाचणी (रागी) पिकाच्या MSP मध्ये 2013-14 च्या तुलनेत 3.5 पट वाढ झाल्याचाही सरकारने उल्लेख केला.
सरकारच्या आकडेवारीनुसार, MSP अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी एकूण रक्कम 2004-14 मधील ₹7.41 लाख कोटींवरून 2014-26 या कालावधीत ₹26.32 लाख कोटींवर पोहोचली आहे. म्हणजेच तब्बल 3.6 पट वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, MSP वाढीच्या घोषणेमुळे शेतकरी संघटनांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही संघटनांनी या वाढीचे स्वागत केले असले तरी उत्पादन खर्च, खतांचे दर, मजुरी आणि वाहतूक खर्चाच्या तुलनेत ही वाढ अपुरी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेली ही घोषणा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरणार की केवळ राजकीय रणनीती, याकडे आता देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.