APMC धान्य मार्केटमध्ये अभियांत्रिकी विभागाचा ‘जुगाड’ कारभार?, गटारांच्या चेंबरवर दोन-दोन कव्हरे, अपघाताचा धोका वाढला
-पावसाळ्यापूर्वी देखभाल नाही दोरीने बसवलेली कव्हरे, माथाडी कामगारांकडून काम करून घेतल्याचा आरोप
Mumbai Apmc News एपीएमसी न्यूज नेटवर्क:राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार   मुंबई APMCच्या धान्य मार्केटमध्ये अभियांत्रिकी विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पावसाळा सुरू असतानाही बाजार परिसरातील अनेक ठिकाणी पाणी साचत असून, गटार लाईनवरील चेंबरची कव्हरे नसल्याने व्यापारी, माथाडी कामगार आणि बाजारात ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर चेंबरच्या मापाचे नवीन कव्हर बसविण्याऐवजी घाईगडबडीत एका चेंबरवर दोन कव्हरे एकाला एक लागून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती व देखभाल केली असती, तर ही वेळ आली नसती, अशी तीव्र नाराजी बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण धान्य मार्केटमध्ये अनेक ठिकाणी चेंबरवर एकच समतल कव्हर बसविण्याऐवजी दोन-दोन कव्हरे स्लॅबवर ठेवण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. ही कव्हरे फुटपाथच्या पातळीला समतल नसल्याने माथाडी कामगार, व्यापारी आणि नागरिकांना रोजच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मालाची ने-आण करताना अपघात होण्याचा धोका वाढला असल्याची तक्रार बाजारघटकांनी केली आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी चेंबरवरील कव्हर दोरीच्या सहाय्याने बसविण्यात येत असल्याचे फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे हे काम अभियांत्रिकी विभागाच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांऐवजी माथाडी कामगारांकडून करून घेतले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अभियांत्रिकी विभागाच्या कामाच्या दर्जावर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कव्हरे योग्य पद्धतीने न बसवल्यामुळे ये-जा करताना पाय अडकून गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात अशा प्रकारचा निष्काळजीपणा का केला जात आहे? अभियांत्रिकी विभागाकडून निकृष्ट आणि तात्पुरत्या स्वरूपाची कामे का केली जात आहेत? असा सवाल व्यापारी उपस्थित करत आहेत.
आता या धोकादायक परिस्थितीची तातडीने दखल घेऊन सर्व चेंबरवर मानकानुसार मजबूत व समतल कव्हरे बसविण्यात येणार का? तसेच या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण बाजारातील बाजारघटकांचे लक्ष लागले आहे.