Chinchondiचा Maize Processing Project! ५० हजारांहून अधिक मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा
येवला : येवला तालुक्यातील चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मका प्रक्रिया उद्योगामुळे जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठी, विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन, पार्किंग शेडसह विविध विकासकामांचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी बाजार समितीत कृषी भवन आणि माथाडी भवन उभारण्याची घोषणा केली.
कृषी भवनासाठी १५ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली असून, माथाडी भवनासाठी बाजार समितीने तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश भुजबळ यांनी दिले.
चिंचोंडी मका प्रक्रिया प्रकल्पामुळे सुमारे एक हजार प्रत्यक्ष आणि तीन हजारांपर्यंत अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, दुरुस्ती, देखभाल, कृषिमाल पुरवठा आणि सेवा क्षेत्रातील पूरक व्यवसायांनाही याचा फायदा होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी खासदार भास्कर भगरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार मारोतीराव पवार, बाजार समितीचे सभापती वसंत पवार, उपसभापती रतन बोरनारे, सचिव कैलास व्यापारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.