दसऱ्याच्या तोंडावर झेंडूचे दर घसरले! आवक वाढली, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
मुंबई APMCमध्ये झेंडू ४० ते ६० रुपये किलो दर्जेदार फुलांना ८० ते १०० रुपये दर
 
नवी मुंबई : दसऱ्याच्या सणात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असतानाच मुंबई APMC च्या परिसरात फूल बाजारात आवक वाढल्याने घाऊक दरात घसरण झाली आहे. नाशिक, पुणे आणि राजगुरुनगर परिसरातून मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले दाखल होत असून, सध्या सर्वसाधारण प्रतीच्या झेंडूला किलोमागे ४० ते ६० रुपये, तर चांगल्या प्रतीच्या फुलांना ८० ते १०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूची आवक चांगली असल्याने बाजारात फुलांचा पुरवठा वाढला आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे फुलांचा ताजेपणा लवकर कमी होत असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फुले कमी दरात विकावी लागत आहेत. फुले जास्त काळ साठवून ठेवणे शक्य नसल्याने दर वाढण्याची वाट पाहण्याऐवजी उपलब्ध दरात विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे.
दसरा आणि विजयादशमीच्या काळात झेंडूच्या फुलांना तोरण, हार आणि सजावटीसाठी मोठी मागणी असते. मात्र, आवक वाढल्याने घाऊक बाजारातील दर दबावाखाली आले आहेत. सणासुदीच्या काळातही अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन, वाहतूक आणि मजुरीचा खर्च भागवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दसऱ्याच्या बाजारपेठेत फुलांची रेलचेल असली, तरी झेंडू उत्पादकांच्या आर्थिक गणितावर मात्र परिणाम होत आहे.