कोकणातील आंबा-काजू उत्पादक आक्रमक मुंबईत शेतकरी नेत्यांची धरपकड
राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलन चिघळले
मुंबई : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी मोठी धरपकड केली. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ , शेकापचे जयंत पाटील , शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण चांगलेच तापले.
अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे यंदा कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारने जाहीर केलेली केवळ २२ हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी मुंबईत धडक मोर्चा काढला.
गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्याकडे मोर्चा नेण्याची तयारी आंदोलकांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र (फडणवीस Fadnavis) यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी असल्याचे सांगितले. मात्र, आंदोलक मुख्यमंत्री निवासस्थानावर जाण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
धरपकडीनंतर राजू शेट्टी यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता. शांततेत आंदोलनासाठी जात असताना पोलिसांनी दमदाटी आणि धक्काबुक्की करत आम्हाला ताब्यात घेतले. आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्याआधी अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी न्यायासाठी आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री अनेकदा कोकण दौऱ्यावर गेले, पण शेतकऱ्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच कोकणातील शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत आला, पण सरकारने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही.”
दरम्यान, या आंदोलनामुळे राज्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा संताप आता अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.