50 किलो वजनाचा तिढा कायम, कांदा-बटाटा मार्केट बंद न करण्याचे पणन मंत्र्यांचे आदेश!
दोन तास बैठक, तोडगा नाही पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या सूचना
बाजार बंद पडल्यास शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता
५० किलो वजनाच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती मोहीम आणि प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करा -पणन मंत्री
व्यापारी, माथाडी कामगारांना आंदोलन स्थगित करून बाजार सुरळीत ठेवण्याचे आवाहन
मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये शेतमालाच्या गोणीचे ५० किलो वजन मर्यादेच्या अंमलबजावणीवरून निर्माण झालेला तिढा कायम आहे. या प्रश्नावर मंगळवारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या दालनात तब्बल दोन तास बैठक झाली. मात्र, बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, कांदा-बटाटा मार्केट कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देऊ नका, असे स्पष्ट निर्देश पणन मंत्र्यांनी दिले.
बाजार बंद पडल्यास शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, गरज भासल्यास पर्यायी व्यवस्था उभी करा, असेही आदेश रावल यांनी प्रशासनाला दिले. तसेच ५० किलो वजनाच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती मोहीम आणि प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना पणन संचालकांना देण्यात आल्या.
मुंबई APMCच्या कांदा-बटाटा बाजारात येणाऱ्या शेतमालापैकी सुमारे ९० टक्के माल हा व्यापारी-ते-व्यापारी व्यवहारातून येतो, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे मुंबईतील व्यापाऱ्यांनी ज्या व्यापाऱ्यांकडून कांदा-बटाटा मागविला जातो, त्यांना ५० किलोच्या आतच शेतमाल गोणीत भरून पाठविण्याच्या सूचना द्याव्यात, असे ठरविण्यात आले. राज्यातील तसेच परराज्यातील व्यापारी, शेतकरी आणि कामगारांनी एकत्रितपणे या नियमाबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले.
दुष्काळी परिस्थिती आणि नियमनमुक्तीमुळे आधीच बाजार आवाराबाहेर व्यापाराचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत ५० किलोच्या नियमाची अंमलबजावणी करताना शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या भविष्यातील उत्पन्नावर होणारा परिणाम लक्षात घ्यावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांचा कालावधी देऊन टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी आणि आंदोलन स्थगित करून बाजारातील व्यवहार सुरळीत करावेत, अशी चर्चा झाली.
दरम्यान, माथाडी कामगारांच्या हिताचा विचार करता पुढील दोन-तीन महिन्यांत ५० किलो वजनाच्या नियमाची अंमलबजावणी आवश्यक असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात येथून येणारा बटाटा तसेच नाशिक, पुणे आणि इतर भागांतून मुंबई APMCमध्ये येणाऱ्या कांद्याच्या गोण्या ५० किलोच्या आत भरून पाठविण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत. यासाठी जनजागृतीसह विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती APMCचे सचिव राजाराम धोंडकर यांनी दिली.
बैठकीला पणन मंत्री जयकुमार रावल, माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शरद सोनवणे, रवी पाटील, कांदा-बटाटा व्यापारी संघाचे संजय पिंगळे, राजू मणियार, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे , पणन विभागाचे सचिव, पणन संचालक संजय कदम, मुंबई APMCचे सचिव राजाराम धोंडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.