BIG BREAKING: मुंबई APMC सचिव शरद जरे यांची ‘उचल बांगडी, राजाराम धोंडकर मुंबईच्या सचिवपदी
पुणे बाजार समितीचे राजाराम धोंडकर मुंबई APMCच्या सचिवपदी शासनाच्या आदेशाने जरे यांचे सहकार विभागाकडे प्रत्यावर्तन
मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मध्ये मोठा प्रशासकीय बदल झाला आहे. मुंबई APMCचे सचिव शरद जरे यांचे प्रत्यावर्तन करण्याचा शासनाचा निर्णय झाला असून, त्यांच्या जागी पुणे बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांच्याकडे मुंबई APMC सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. धोंडकर यांनी मुंबई APMCच्या सचिवपदाचा कारभार स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
शासन आदेशात नेमकं काय म्हटलंय?
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मधील राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारासंदर्भातील तरतुदींनुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या व्यवस्थेत राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार समितीच्या सचिवपदासाठी सहनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आदेशात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, शरद जरे, अपर निबंधक, सहकारी संस्था यांना त्यांच्या मूळ संवर्गातील सहकार विभागाकडे प्रत्यावर्तित करणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांना त्यांच्या मूळ सहकार विभागाकडे रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
११ महिन्यांच्या कारभारानंतर मोठा फेरबदल
शरद जरे यांच्या सुमारे ११ महिन्यांच्या कार्यकाळात पणन संचालक व मुंबई APMCच्या कारभाराबाबत APMC NEWSकडून सातत्याने विविध प्रश्न उपस्थित करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. अभियांत्रिकी विभागातील कामे, प्रशासनातील निर्णय, महसूल आणि सेस लिकेजसह विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
दरम्यान, राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष आणि पणन मंत्री यांच्या पातळीवरही APMCच्या कारभाराचा आढावा घेतला जात असल्याची चर्चा होती. आता शासनाच्या आदेशानंतर जरे यांचे प्रत्यावर्तन झाल्याने या प्रशासकीय बदलाकडे बाजार घटकांचे विशेष लक्ष लागले आहे.
मुंबई APMCची सूत्रे आता धोंडकरांकडे
शरद जरे यांच्या जागी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांच्याकडे मुंबई APMC सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. धोंडकर यांनी मुंबई APMCच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारल्याने राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा कारभार आता त्यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे.या बदलानंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मुंबई APMCच्या महसूलवाढीपासून सेस लिकेज, बाजारातील अनधिकृत व्यवहार, प्रशासनातील प्रलंबित प्रश्न आणि विविध कामांबाबत धोंडकर कोणती भूमिका घेतात? याकडे आता बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.