नाफेड-एनसीसीएफच्या कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह, गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा सडलेला
चांदवड : नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून जुलै २०२६ मध्ये खरेदी करण्यात आलेला कांदा चांदवडमधील एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. गणूर रोडलगतच्या या गोडाऊनची तालुका दक्षता समितीने अचानक पाहणी केली असता हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, कांदा खरेदीशी संबंधित आवश्यक माहिती आणि कागदपत्रे मागूनही संबंधित प्रतिनिधींनी ती उपलब्ध करून दिली नसल्याची नोंद दक्षता समितीने केली आहे.
नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि एनसीसीएफने नियुक्त केलेल्या खासगी संस्थांमार्फत कांदा खरेदी सुरू आहे. या प्रक्रियेत अनियमितता आणि गैरव्यवहाराच्या तक्रारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कांदा खरेदीची नियमित पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना या समित्यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चांदवड तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास, तालुका कृषी अधिकारी निलेश मालवे आणि पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांच्या पथकाने गणूर रोडलगतच्या गोडाऊनची पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या खरेदीची माहिती मागवली
पाहणीदरम्यान समितीने संबंधित संस्थांकडून पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या, प्रत्यक्ष कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांची संख्या, प्रलंबित खरेदी, पात्रतेचे संदेश, सातबाऱ्यावर कांदा पिकाची नोंद, खरेदीवेळी शेतकऱ्याची उपस्थिती, वजन पावती आणि पोर्टलवरील नोंद तसेच डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा कालावधी यासह विविध माहिती मागितली.
मात्र आवश्यक उत्तरे आणि कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे दक्षता समितीने नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे.
गोडाऊनमध्ये दुर्गंधी मोठ्या प्रमाणात कांदा सडलेला
गोडाऊनमध्ये पाहणी करताना परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सहाय्यक निबंधक, तालुका कृषी अधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी कांदा चाळीवर चढून पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात कांदा सडलेल्या अवस्थेत आढळला.
या संपूर्ण प्रकाराचा पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून त्यावर स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या आहेत.
सडलेल्या कांद्यावर चांगल्या कांद्याचा थर?
दरम्यान, सडलेला कांदा दिसू नये यासाठी त्यावर वरच्या बाजूला चांगला कांदा टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. तसेच दुर्गंधी कमी करण्यासाठी रासायनिक पावडरचा वापर करण्यात आल्याचाही आरोप आहे.
या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक असले तरी दक्षता समितीच्या पाहणीत मोठ्या प्रमाणात कांदा सडलेल्या अवस्थेत आढळल्याने नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता या कांद्याची खरेदी नेमकी कोणत्या संस्थेने केली? किती कांदा खरेदी झाला? शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले का? आणि सडलेल्या कांद्याच्या साठ्याची जबाबदारी कोणाची? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.