मल्चिंग पेपरवर कांदा लागवड : खर्च कमी, उत्पादन वाढीची हमी! एकरी खर्च किती, मिळकत किती?
नाशिक :
नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी देशभरात ओळखला जातो. बदलत्या हवामानासोबतच मजुरांची वाढती टंचाई लक्षात घेता शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत आहेत. टोमॅटो, काकडी, मिरची, टरबूज, खरबूज, वांगी यांसारख्या पिकांनंतर आता कांदा लागवड मल्चिंग पेपरवर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील प्रगतशील शेतकरी बापूसाहेब नरोडे यांनी तीन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरून कांदा लागवड केली आहे. त्यांनी संपूर्ण क्षेत्राची योग्य मशागत करून आवश्यक खते टाकली असून त्यानंतर मल्चिंग पेपर अंथरून कांदा रोपांची लागवड केली आहे.
एक एकरमध्ये तब्बल ३ लाख ८ हजार रोपे
या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे लागवडीची घनता. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत मल्चिंग पेपरवर लागवड केल्यास एक एकरमध्ये सुमारे ३ लाख ८ हजार कांदा रोपे बसवता येतात. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
पाणी, तण आणि मजूर खर्चात मोठी बचत
मल्चिंग पेपरमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, तण उगवत नाही आणि पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. ठिबक सिंचनासोबत ही पद्धत अधिक परिणामकारक ठरत असून मजूर खर्चही कमी होतो.
एकरी खर्च किती?
मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीसाठी अंदाजे एकरी खर्च पुढीलप्रमाणे –
• रासायनिक खते : ₹15,000
• मल्चिंग पेपर : ₹10,000
• साधे ठिबक सिंचन : ₹10,000
एकूण अंदाजे खर्च : ₹35,000 प्रति एकर
उत्पादन किती मिळते?
तज्ज्ञांच्या मते, योग्य व्यवस्थापन केल्यास या पद्धतीत पारंपरिक लागवडीपेक्षा 20 ते 30 टक्के अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. कांद्याचा आकार एकसारखा, वजनदार आणि दर्जेदार मिळत असल्याने बाजारात चांगला दर मिळतो.
शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग
कांदा उत्पादक पट्ट्यात गेल्या काही वर्षांत लागवड पद्धतीत मोठा बदल दिसून येत आहे. मल्चिंग पेपरवर कांदा लागवड ही पद्धत पाणी बचत, मजूर टंचाई आणि उत्पादनवाढ या तिन्ही आघाड्यांवर फायदेशीर ठरत असल्याने भविष्यात अधिक शेतकरी या तंत्रज्ञानाकडे वळण्याची शक्यता आहे.