साखरेचे दर ५८ वरून थेट ४७ रुपयांवर, दिवाळीआधी ग्राहकांना मोठा दिलासा!
मुंबई APMCमध्ये दररोज २०० टन आवक केंद्राच्या आयात निर्णयामुळे बाजारातील पुरवठा सुरळीत
नवी मुंबई : मागील महिन्यात ५८ रुपयांवर पोहोचलेले साखरेचे दर आता थेट ४७ रुपयांवर आले आहेत. नव्या हंगामातील साखरेची आवक आणि बाजारातील पुरवठा सुरळीत झाल्याने दरात घसरण झाली आहे. मुंबई APMC मार्केटमध्ये दररोज सुमारे २०० टन साखरेची आवक होत असून घाऊक बाजारात किलोला ४६ ते ४७ रुपये भाव मिळत आहे. केंद्र सरकारने १० लाख टन साखर आयातीला परवानगी देत साठ्यावरही निर्बंध लावले आहेत. त्यामुळे दिवाळीआधी ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी दिवाळीनंतर साखरेच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता बाजारातील घटकांकडून व्यक्त होत आहे.
मागील महिन्यात साखरेचा तुटवडा आणि वाढती मागणी यामुळे बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली होती. काही ठिकाणी किरकोळ बाजारात दर ५८ रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. मात्र, नव्या हंगामातील साखर बाजारात दाखल होऊ लागल्याने तसेच पुरवठा वाढल्याने दरात आता लक्षणीय घट झाली आहे.
मुंबई APMCच्या भुसार बाजारात सध्या दररोज सुमारे २०० टन साखरेची आवक होत आहे. घाऊक बाजारात साखरेला दर्जानुसार ४६ ते ४७ रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील दरही कमी झाले असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सण-उत्सवासाठी झालेली गुळाची खरेदी आता कमी झाल्याने गुळाच्या मागणीतही घट झाली आहे. मुंबई APMCमध्ये नैसर्गिक पद्धतीने तयार होणाऱ्या गुळाची दररोज ८० ते १०० टन आवक होत आहे. मागणी कमी झाल्याने गुळाच्या दरातही मंदीचे वातावरण आहे. घाऊक बाजारात दर्जानुसार एक नंबर गुळाला ४५ ते ५६ रुपये किलो भाव मिळत आहे.
१० लाख टन साखर आयातीला परवानगी
मागील काही आठवड्यांत साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बाजारातील पुरवठा वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. १० लाख टन तयार साखर आयातीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच साखरेच्या साठ्यावर निर्बंध घालण्यात आले असून व्यापाऱ्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त साठा ठेवू नये, यासाठी साठ्याची नियमित माहिती घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपाययोजनांमुळे सध्या साखरेचे दर नियंत्रणात आले असले, तरी दिवाळीचा सण संपल्यानंतर मागणी आणि बाजारातील पुरवठा यावर दराची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर साखरेच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता बाजारातील व्यापारी आणि घटकांकडून व्यक्त केली जात आहे.