नागपूर APMC घोटाळा: SIT कारवाईने खळबळ कार्यालय सील, सचिवाची बदली, संचालक मंडळ चौकशीत

नागपूर, एपीएमसी न्यूज नेटवर्क : नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल ४० कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर अखेर राज्य शासनाने तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून कारवाईला सुरूवात केली आहे. SIT ने चौकशीच्या आदेशानंतर लगेचच बाजार समितीचे कार्यालय सील करण्यात आले असून, विद्यमान सचिव येगलेवाड यांची बदली पुण्याला केली आहे. ही धडक कारवाई होताच बाजार समिती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
▪ मुंबई व नागपूरचे माजी सचिव राजेश भुसारी चौकशीच्या केंद्रस्थानी
या घोटाळा प्रकरणात मुंबई व नागपूर APMC चे माजी सचिव आणि विभागीय सहनिबंधक राजेश भुसारी यांची मुख्य भूमिका असल्याचे उघड झाले आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पावसाळी अधिवेशनात ही बाब लक्षवेधी स्वरूपात मांडली. भुसारी यांना काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचा वरदहस्त असल्याचा आरोपही खोपडे यांनी केला आहे.
▪ संचालक मंडळही चौकशीत राजकीय वरदस्त्याचा संशय
बाजार समितीच्या संचालक मंडळावरही चौकशीच्या फेऱ्यात आले आहे. भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि आशिष देशमुख यांनीही विधानसभेत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याआधी शासनाने नियुक्त केलेल्या A. D. पाटील समिती व खंडागळे समितीने सादर केलेल्या अहवालात दलाल, संचालक आणि तत्कालीन सचिवांच्या संगनमताने झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे सादर केले होते.
▪ SIT तपास पथकाची रचना
राज्य शासनाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी SIT स्थापन करताना नागपूरचे जिल्हाधिकारी यांना अध्यक्ष, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना सदस्य आणि औरंगाबादचे सहकार उपनिबंधक यांना सचिव म्हणून नियुक्त केले आहे. या त्रिसदस्यीय समितीला ३० दिवसांत सविस्तर चौकशी अहवाल सादर करावा लागणार आहे.
▪ २०१७ पासून तक्रारी अहवाल सादर पण कारवाई नाही!
कळमना बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या तक्रारी २०१७ पासून सातत्याने येत होत्या.
-A.D. पाटील समिती (२०१७) — भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
-खंडागळे समिती (एक सदस्यीय) — ४० कोटींहून अधिक महसुली नुकसान
या दोन्ही समित्यांनी ५१ दलाल, सचिव व संचालक मंडळाच्या संगनमताचा ठपका ठेवला होता.
▪ ‘दोषींवर कारवाई, निर्दोषांना शिक्षा नको’
बाजार समितीतील कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, खरे दोषी वाचतील आणि सामान्य कर्मचारी अडकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याआधी मुंबई APMCमधील ६२ कोटी FSI घोटाळा आणि ८ कोटींचा शौचालय घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात गुन्हे दाखल होऊनही आजतागायत चार्जशीट दाखल झालेली नाही.
निष्कर्ष:
कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा दुवा असलेली यंत्रणा आहे. मात्र अशा संस्थांमध्येच भ्रष्टाचार फोफावतोय हे दुर्दैवी. नागपूरच्या या प्रकरणात SIT ने कारवाईचा धडाका सुरू केला असला, तरीही फक्त कारवाईपुरती मर्यादित न राहता खऱ्या दोषींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही शेतकरी आणि जनतेची प्रमुख अपेक्षा आहे.
नागपूर APMC मधील 40 कोटींच्या घोटाळ्यावर SIT ची धडाकेबाज कारवाई सुरू
▪ कार्यालय सील
▪ सचिव बदली
▪ संचालक मंडळ चौकशीत
▪ काँग्रेस नेत्यांचा वरदहस्त असलेल्या भुसारी यांची चौकशी सुरू
कोण वाचणार? कोण जाणार आत?
#NagpurNews #APMCScam #SIT #Corruption #MarketCommittee #SITAction #AgricultureCorruption #राजेशभुसारी  
#SunilKedar #MaharashtraPolitics #शेतकऱ्यांचा_हक्क #भ्रष्टाचार_खत्म