CBIची मोठी कारवाई: वडाळ्यातील भूखंडाच्या NOC साठी १ कोटींची लाच! ५० लाख स्वीकारताना नातेवाईक जाळ्यात, CPWD कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना अटक
मुंबई : वडाळा येथील भूखंडासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याच्या बदल्यात एक कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. चर्चेनंतर लाचेची रक्कम ७० लाख रुपयांवर निश्चित झाली होती. त्यापैकी ५० लाख रुपये स्वीकारताना कार्यकारी अभियंत्याच्या नातेवाईकाला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (CPWD) कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
रकमेची तडजोड ५० लाखांची रोकड जप्त
CBIच्या तपासानुसार, वडाळ्यातील भूखंडासाठी NOC मिळवून देण्याच्या बदल्यात सुरुवातीला एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. चर्चेनंतर ही रक्कम ७० लाख रुपयांवर निश्चित झाली. त्यानुसार, ५० लाख रुपये तत्काळ आणि उर्वरित २० लाख रुपये आठवड्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र, पहिल्या टप्प्यातील ५० लाख रुपयांचा व्यवहार सुरू असतानाच CBIने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यक्तींचाही समावेश
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये CPWDच्या कार्यकारी अभियंत्याबरोबरच मुंबईतील एका रिअल इस्टेट समूहाचा उपाध्यक्ष, व्यवस्थापक आणि NOCसाठी अर्ज करणाऱ्या कंपनीचा भागीदार यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. कार्यकारी अभियंत्याचा नातेवाईक लाचेची रक्कम स्वीकारताना पकडला गेल्यानंतर तपास यंत्रणेने पुढील कारवाई करत इतर आरोपींनाही अटक केली.
डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंद नसल्याचा संशय
संबंधित भूखंडासाठी जारी करण्यात आलेल्या NOCची डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली नसल्याची बाब तपासात समोर आल्याचे CBIने सांगितले आहे. त्यामुळे NOC जारी करण्याच्या प्रक्रियेबाबतही तपास सुरू आहे.
मुंबई, नवी मुंबई, पुण्यात छापे
या प्रकरणाचा तपास पुढे नेत CBIने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील आरोपींशी संबंधित ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत लाचेच्या ५० लाख रुपयांव्यतिरिक्त आणखी ५३.८७ लाख रुपयांची रोकड आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. अटक केलेल्या पाचही आरोपींना मुंबईतील CBIच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.