लातूर बाजार समितीत नियमांची पायमल्ली; माथाडी कामगारांच्या जीवाशी खेळ!
५० किलो मर्यादेचा फज्जा लातूर APMC मध्ये कामगारांकडून १२० किलोपर्यंतची पोती उचलून घेतल्याचा आरोप
डबल एस बारदाना ठरतोय कामगारांसाठी घातक?
कोट्यवधींची उलाढाल… पण माथाडी कामगार असुरक्षित!
मुंबई Apmc प्रमाणे लातूरमध्येही जड पोत्यांवर बंदीची मागणी
एपीएमसी न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगारांच्या आरोग्याचा विचार करून ५० किलोपेक्षा जास्त वजनाचे ओझे वाहण्यास स्पष्ट बंदी घातली असतानाही, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
बाजार समितीत आजही ‘डबल एस’ नावाच्या जड बारदान्याचा वापर सुरू असून, कामगारांकडून तब्बल १०० ते १२० किलो वजनाची पोती उचलून घेतली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अनेक माथाडी कामगारांना कंबरदुखी, मणक्याचे विकार आणि शारीरिक दुखापतींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे.
माथाडी कामगार नेत्यांनी मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये ज्या पद्धतीने जास्त वजनाच्या शेतमाल उचलण्यावर निर्बंध आणले, त्याच धर्तीवर लातूर बाजार समितीतही तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. “कामगार हे मशीन नाहीत त्यांच्या जीवाचाही विचार झाला पाहिजे,” अशी भावना कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.
दररोज हजारो क्विंटल शेतमालाची आवक असलेल्या लातूर बाजार समितीत सुरक्षेच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कामगारांकडे कोणतीही सुरक्षा साधने नसताना जीव धोक्यात घालून काम सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक ठिकाणी अवजड मालाची धोकादायक पद्धतीने चढ-उतार केली जात असून प्रशासनाकडून कोणतेही नियंत्रण नसल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, बाजार समितीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असतानाही माथाडी कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने नाराजी वाढत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
या सर्व प्रकारामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा सवालही माथाडी कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.