BREAKING: बाजार आवारत फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेव्यांतील केमिकल भेसळीवर सरकारचा मोठा दणका
दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार राज्यातील सर्व APMC आणि खासगी बाजारांना पणन संचालकांचे कडक आदेश
एपीएमसी न्यूज नेटवर्क: राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या (APMC), खासगी बाजार आणि थेट पणन परवाना धारकांना महाराष्ट्र शासनाने मोठा इशारा दिला आहे. फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेवा कृत्रिमरीत्या प्रक्रिया करण्यासाठी, रंग-चमक वाढवण्यासाठी किंवा टिकाऊपणा वाढवण्यासाठी घातक केमिकलचा वापर करणाऱ्यांवर आता थेट कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेवा यामध्ये केमिकल स्प्रे व भेसळीचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. काही व्यापारी आणि अन्न व औषध प्रशासनातील संबंधित घटकांच्या संगनमताने हा उद्योग सुरू असल्याच्या चर्चाही बाजार वर्तुळात रंगत होत्या. या पार्श्वभूमीवर पणन संचालक शरद जरे यांनी पहिल्यांदाच कठोर भूमिका घेत राज्यभरासाठी कडक आदेश जारी केले आहेत.
जरे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, बाजार आवारात विकल्या जाणाऱ्या फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेवा यामध्ये भेसळ करणे, रंग वाढवण्यासाठी रसायनांचा वापर करणे किंवा टिकवण्यासाठी घातक केमिकलचा वापर करणे आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, दोषी आढळणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यासह बाजारातील सुविधा देखील काढून घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील सर्व APMC, खासगी बाजार समित्या आणि थेट पणन परवाना धारकांना नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयित शेतमालाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेवा यामध्ये वाढत्या प्रमाणात होत असलेल्या केमिकल वापराबाबत ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्यानंतरच पणन संचालकांनी हे कठोर पाऊल उचलल्याची चर्चा बाजार वर्तुळात सुरू आहे.