माथाडी बोर्डात कामगारांच्या नोंदणी शुल्क ₹१, लाचेचा दर तब्बल ₹५० हजार!
निरीक्षक ते सचिव-चेअरमनपर्यंत आर्थिक साखळी? नरेंद्र पाटील यांची चौकशीची मागणी
माथाडी बोर्डात ‘पैशांचा खेळ’? ट्रान्सपोर्ट, रेल्वे, ग्रोसरी बोर्डात भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र पाटलांचं ACBकडे तक्रारीचं आवाहन
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क | 
नवी मुंबई माथाडी कामगारांच्या नोंदणी क्रमांकासाठी तब्बल ५० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ४३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एपीएमसीतील किराणा बाजार व दुकाने मंडळाच्या क्रमिक निरीक्षकासह एका सुरक्षा कर्मचाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जाळ्यात पकडले. या कारवाईनंतर माथाडी कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेतील कथित आर्थिक व्यवहारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
क्रमिक निरीक्षक भरत कदम आणि सुरक्षा कर्मचारी विजय पवार अशी आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोंदणीसाठी लाच मागितल्याच्या या प्रकरणात सचिव अनिल कुटे यांच्या नावाचा वापर झाल्याने त्यांच्या भूमिकेचाही तपास होणार असल्याचे समोर आले आहे.
५० हजारांची मागणी, ४३ हजारांची लाच
एका माथाडी कामगाराने पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचा नोंदणी क्रमांक दुसऱ्या इच्छुक व्यक्तीला देण्यात आला होता. या जागेवर नोंदणी करण्यासाठी संबंधित व्यक्तीने किराणा बाजार व दुकाने मंडळाकडे अर्ज केला. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी विजय पवार याने तक्रारदाराला कार्यालयात बोलावून नोंदणीसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय नोंदणी होणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराची निरीक्षक भरत कदम याच्याशी भेटही घडवून आणण्यात आली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नवी मुंबई ACBकडे तक्रार केली. पडताळणीदरम्यान लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
तक्रारदार कदमच्या दालनात गेल्यानंतर ४५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पाच हजार रुपये नंतर दिले तरी चालतील, असे सांगत उर्वरित रक्कम देण्याचा आग्रह करण्यात आला. ही रक्कम दिल्यास सचिव अनिल कुटे यांची नोंदणीवरील सही मिळवून देण्याचे सांगण्यात आल्याचे ACBच्या कारवाईत समोर आले.
अखेर तडजोडीनंतर ४३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भरत कदम आणि विजय पवार यांच्यावर ACBने कारवाई केली.
₹१ ची पावती, कथित लाचेची मागणी ₹५० हजार?
या ACB कारवाईनंतर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी नोंदणी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. माथाडी कामगारांच्या नोंदणी क्रमांकासाठी मिळणाऱ्या ₹१ च्या पावतीमागे तब्बल ₹५० हजारांची लाच मागितली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ग्रोसरी बोर्ड आणि रेल्वे बोर्डातील माथाडी कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत फाईल दोन ते सहा महिने प्रलंबित ठेवून आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा, तर पैसे देणाऱ्या कामगारांना मात्र एका दिवसात नोंदणी क्रमांकासह पावती मिळत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
फाईल ६ महिने प्रलंबित का?
मागील पाच वर्षांत किती माथाडी कामगारांची नोंदणी झाली, किती फाईल दोन ते सहा महिन्यांपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आल्या आणि त्या फाईल प्रलंबित ठेवण्यामागचे कारण काय, याची सखोल चौकशी करण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
पैसे दिल्यानंतरच नोंदणी प्रक्रिया वेगाने पूर्ण होते का? तसेच नोंदणी प्रक्रियेत विलंब करण्याचा अधिकार कोणाकडे आहे, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
‘निरीक्षक ते चेअरमनपर्यंत आर्थिक साखळी?’
नोंदणी प्रक्रियेतील हा कथित प्रकार केवळ एका कर्मचाऱ्यापुरता मर्यादित आहे की त्यामागे मोठी यंत्रणा कार्यरत आहे, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निरीक्षकापासून सचिव आणि चेअरमनपर्यंत आर्थिक व्यवहारांची साखळी असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत पत्रव्यवहार करून संबंधितांची भूमिका तपासण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ACBकडे कागदपत्रांसह पाठपुरावा करणार
माथाडी बोर्डातील नोंदणी प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराची व्याप्ती तपासण्यासाठी मागील पाच वर्षांतील नोंदणीची माहिती, प्रलंबित फाईल, नोंदणी क्रमांक जारी करण्यासाठी लागलेला कालावधी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
‘अधिकृत पावती ₹१ आणि कथित लाचेची मागणी ₹५० हजार, हा प्रकार नेमका कसा चालतो?’ असा सवाल उपस्थित करत या प्रकरणातील सर्व माहिती आणि पत्रव्यवहार ACBकडे देऊन लवकरच पाठपुरावा करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.