स्वातंत्र्यानंतर प्रथमच RSSचे सरसंघचालक APMCमध्ये दाखल!
मोहन भागवत यांचे शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीचे आवाहन म्हणाले, ‘शेती हा सृष्टीचे पोषण करणारा धर्म’
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
स्वातंत्र्यानंतर प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यवतमाळ येथील   चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला डॉ. भागवत उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करत रासायनिक शेतीच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त केली.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दीनदयाळ प्रतिष्ठानच्या वतीने चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भागवत यांनी शेती, शेतकरी आणि पर्यावरण यांच्यातील संबंधावर भाष्य केले.
‘शेती हा केवळ नफा कमावण्याचा व्यवसाय नसून सृष्टीचे पोषण करणारा धर्म आहे,’ असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले. भारतीय संस्कृतीमध्ये शेतीला समाजाच्या कल्याणाशी जोडले गेले आहे. मात्र वाढता उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व यामुळे शेतकरी अडचणीत येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रासायनिक शेतीवर चिंता
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अनिर्बंध वापरामुळे जमिनीचे आरोग्य आणि मानवी जीवनावर परिणाम होत असल्याचे भागवत यांनी सांगितले. केवळ उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने पर्यावरणाचा समतोल बिघडविणारा विकास शाश्वत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी ‘कॅन्सर ट्रेन’चा दाखला देत रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. जमिनीतील पाण्याची पातळी, प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्वतःची बियाणे-खते तयार करा’
शेतकऱ्यांनी बाजारातील रासायनिक कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करून स्वतःचे बियाणे, सेंद्रिय खते आणि नैसर्गिक कीटकनाशके तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
जमीन कमी असली किंवा कोरडवाहू असली तरी पशुपालन, मिश्र पीकपद्धती आणि स्थानिक संसाधनांच्या आधारे शेतकरी सन्मानाने जगू शकतो, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.
मातीचा कस जपण्याचे आवाहन
केवळ नगदी पिकांच्या मागे न धावता समाजाला सकस आणि विषमुक्त अन्न उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज आहे. शेती करताना जमिनीचा पोत आणि कस जपणे ही शेतकऱ्याची नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
चिंतामणी बाजार समितीच्या प्रांगणात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या भाषणातून शेतकरी, शेतीचे आरोग्य आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धती यांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.