५० किलोच्या पेचावर तोडगा? माथाडींची ५२ किलोपर्यंत तयारी; मंगळवारी निर्णायक बैठक!
मुंबई APMCच्या कांदा-बटाटा बाजारातील संघर्ष निवळण्याची शक्यता पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या बैठकीकडे व्यापारी-माथाडींचे लक्ष
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारातील ५० किलो वजनमर्यादेवरून सुरू असलेल्या व्यापारी-माथाडी संघर्षावर तात्पुरता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माथाडी कामगारांनी ५२ किलोपर्यंत वजनाच्या गोण्या उतरविण्याची तयारी दर्शवली असून, व्यापाऱ्यांनी बाजारातील व्यवहार पूर्ववत सुरू करावेत, असे आवाहन माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केले आहे. दरम्यान, या प्रश्नावर मंगळवारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत निर्णायक बैठक होणार असून, त्यानंतर वजनमर्यादेबाबतची पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे.
५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उतरविण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी कांदा-बटाटा बाजारातील व्यवहार विस्कळीत झाले. शुक्रवारी वाद अधिक तीव्र झाल्याने व्यापाऱ्यांनी बाजारातील व्यवहार बंद ठेवले, तर माथाडी कामगारांनी ५० किलो वजनमर्यादेच्या अंमलबजावणीची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे बाजार परिसरात तणाव निर्माण झाला होता.
शासनाच्या आदेशानुसार ५० किलो वजनमर्यादा लागू करण्याची मागणी माथाडी कामगारांकडून केली जात आहे. दुसरीकडे, नाशवंत शेतमालाच्या गोण्यांमध्ये वजनात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यवहार्य तोडगा काढण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये मतभेद निर्माण झाल्याने बाजारातील कामकाजावर परिणाम झाला.
दरम्यान, आंदोलन आणि चर्चेच्या पार्श्वभूमीवर माथाडी कामगारांनी ५२ किलोपर्यंत वजनाच्या गोण्या उतरविण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बाजारातील व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, ही तात्पुरती भूमिका असून वजनमर्यादेचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
मंगळवारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी, गोण्यांचे वजन आणि माथाडी कामगारांच्या कामाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, यावर कांदा-बटाटा बाजारातील व्यवहारांची पुढील दिशा ठरणार आहे.
मंगळवारच्या बैठकीत काय ठरणार?
* ५० किलो वजनमर्यादेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा.
* ५२ किलोपर्यंतच्या गोण्यांबाबत तोडगा निघण्याची शक्यता.
* व्यापारी आणि माथाडी कामगारांमधील वादावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे आव्हान.
* बाजारातील व्यवहार पूर्णपणे पूर्ववत होण्याबाबत निर्णयाकडे लक्ष.
“आम्ही ५२ किलोपर्यंत वजन असलेल्या गोण्यांचा माल उतरविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत जो निर्णय होईल, त्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करू.”
— नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते