रानभाज्यांची बाजारपेठ फुलली; वाढत्या दरांनंतरही ग्राहकांची मोठी गर्दी
Ranbhaji: रानभाज्यांची बाजारपेठ फुलली! दर वाढले तरी चव आणि औषधी गुणांसाठी ग्राहकांची गर्दी कायम
Ranbhaji:पावसाळ्याच्या आगमनासोबतच अनेक बाजारपेठेत रानभाज्यांची चंगळ सुरू झाली आहे. कुड्याच्या शेंगा, शेवळा, भारांगी, टाकळा, कंटीलो (कंटोळी), पेठारी, भोकर, करांदे, हुलगुंड, कोळी यांसारख्या पारंपरिक रानभाज्या बाजारात दाखल झाल्या असून, दरात वाढ होऊनही ग्राहकांचा उत्साह कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
या रानभाज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लागवड केली जात नाही. पावसाच्या पहिल्या सरींनंतर जंगल परिसरात या भाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. त्यामुळे त्यांची उपलब्धता पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते.
सध्या बाजारातील अंदाजे दर (प्रतिकिलो)
- कुड्याच्या शेंगा : ₹180 ते ₹220
- शेवळा : ₹200 ते ₹250
- भारांगी : ₹180 ते ₹220
- टाकळा : ₹120 ते ₹160
- कंटीलो (कंटोळी) : ₹250 ते ₹350
- पेठारी : ₹180 ते ₹220
- भोकर : ₹140 ते ₹180
- करांदे : ₹180 ते ₹220
- हुलगुंड : ₹150 ते ₹200
- कोळी : ₹150 ते ₹200
रानभाज्यांचे आरोग्यदायी फायदे
- कुड्याच्या शेंगा – रक्तशुद्धी, पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त.
- शेवळा – लोह, कॅल्शियम व तंतुमय घटकांचा उत्तम स्रोत.
- भारांगी – त्वचारोग, खाज, खरूज यांसाठी गुणकारी मानली जाते.
- टाकळा – पचनक्रिया सुधारण्यास आणि यकृताच्या आरोग्यास उपयुक्त.
- कंटीलो (कंटोळी) – फायबर, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध मधुमेह नियंत्रण, पचन सुधारणा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त
- मानली जाते.
- पेठारी – शरीराला आवश्यक सूक्ष्म पोषकद्रव्यांचा चांगला स्रोत.
- भोकर – जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध.
- करांदे – रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत.
- हुलगुंड व कोळी – शरीराला आवश्यक खनिजे व पोषणमूल्यांचा पुरवठा करणाऱ्या पारंपरिक रानभाज्या.
आदिवासी महिलांना रोजगाराचा आधार
तालुक्यातील आदिवासी महिला पावसाच्या सुरुवातीला जंगलातून या रानभाज्या गोळा करून बाजारात विक्रीसाठी आणतात. वाढत्या मागणीमुळे त्यांना चांगला आर्थिक आधार मिळत असून अनेक कुटुंबांसाठी हा पावसाळ्यातील महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत ठरत आहे.
दर वाढले असले तरी पारंपरिक चव, औषधी गुणधर्म आणि पौष्टिक मूल्यांमुळे रानभाज्यांची लोकप्रियता आजही कायम असून ग्राहक त्यांची आवर्जून खरेदी करत आहेत.