राज्यात अद्यापही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल
जून महिना निम्मा सरत आला तरी पावसाने तोंड न दाखविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मॉन्सूनपूर्व पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतातील ढेकळेही फुटली नाहीत. जूनमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी १९ मिलिमीटर पावसाची नोंद आहे.
परिणामी, उडीद- मुगाच्या पेरणीवर परिणाम होणार आहे. आठ दिवसांत पेरणी न झाल्यास हा पेरा करता येणार नाही. नगर जिल्ह्यात सुमारे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, यंदा ६ लाख ३९ हजार ४३० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यात प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस आदी पिके घेतली जातात.
प्रामुख्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागात ही नगदी पिके घेतली जातात. कर्जत, जामखेड, पारनेर, नगर, पाथर्डी, शेवगाव हे तालुके खरिपाचे म्हणून ओळखले जातात. हा भाग दुष्काळी असल्याने त्यांची मदार पावसावरच असते.
उन्हाची तीव्रताही प्रचंड वाढली आहे. पावसाने हजेरी न लावल्याने खते, बियाण्यांच्या बाजारातील उलाढाल मंदावली आहे. दुकानदारांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकरी आणखी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पेरणी करण्यासाठी आवश्यक ओलावा जमिनीमध्ये नसल्याने पेरणीचा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मूग, उडीद, मका या पिकांची पेरणी होते. गेल्या दोन वर्षांत तूर, सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. नगर, पारनेर तालुक्यांत मुगाचे, तर कर्जत, जामखेड तालुक्यांत उडदाचे क्षेत्र मोठे असते. अलीकडे जामखेडला तुरीचे क्षेत्रही वाढत आहे. मात्र पाऊसच न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.