मक्याची आवक वाढली,दरात घसरण
जळगांव : चालूवर्षी मक्याला मागणी कायम राहिल्याने दरात (Maize Rate) तेजी दिसून आली होती. एप्रिलमध्ये २ हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. मात्र वादळी वाऱ्यासह पावसाच्या पार्श्वभूमीवर हंगाम काहीसा प्रभावित झाला.त्यातच पुन्हा रब्बी हंगामातील नवा मका बाजारात (Maize Arrival) येऊ लागला आहे. त्यामुळे आता मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढत आहे. त्यामुळे चालू महिन्यात दरात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी घसरण झाल्याची स्थिती आहे.
२०२२-२३ खरीप हंगामासाठी मक्याला प्रतिक्विंटल १,९६२ रुपये हमीभाव होता. राज्यात आता मक्याला क्विंटलला किमान १,४०१ रुपये ते कमाल २,२५० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. तर सरासरी १,७०० ते १,८०० रुपये दर आहे.मागील खरीप मका आवक कमी आल्याने दरात तेजी कायम होती. त्यामुळे मागणी असल्याने व पुरवठा कमी होत असल्याने दरात सातत्य दिसून आले.हे दर किमान आधारभूत किमतीवर राहिले.एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत २ हजार रुपयांवर दर टिकून होते.मात्र तिसऱ्या सप्ताहापासून आवकेत सुधारणा दिसून आली तर दर हळूहळू कमी झाल्याचे दिसून आले.
सध्या बाजार समित्यांमध्ये आवारात व मका खरेदी विक्री केंद्रांवर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड भागातून रब्बी हंगामातील नव्या रब्बी मक्याची अवाक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.
मागील महिन्याच्या तुलनेत सध्या १५० ते २०० रुपये प्रतिक्विंटलमागे दर कमी झाले आहेत, अशी माहिती येवला येथील रेशीमसुत ट्रेडिंग कंपनीचे संचालक गोकूळ भागवत यांनी दिली.
पोल्ट्री उद्योगाची मागणी असली तरी पुरवठा वाढल्याने दरात घसरण आहे. शिवाय सततच्या पावसामुळे रब्बी हंगाम प्रभावित झाला आहे. नवीन मका पुरेशा वाळला नसल्याने तसेच मका ओला होऊन काही ठिकाणी प्रतवारी घसरल्याने दरावर परिणाम दिसून येत आहे.
मका दर स्थिती:
बाजार...आवक...किमान...कमाल...सरासरी (ता.५ अखेर)
निफाड (लासलगाव)...३७२...१,६९१...१,९२०...१,८७०
विंचूर (लासलगाव)...१,२२६...१,५००...१,८९०...१,७५०
मनमाड...१९३...१,५५०...१,८११...१,७८६
पालखेड (पिंपळगाव बसवंत)...४६४...१,४०१...१,९९१...१,८००
येवला...६३१..१,८५०...१,९१२...१,८७२
साक्री...१८०...१,८००...२,०६०...२,०५०