मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्र्यांच्या PS आणि OSD यांच्या कामावर थेट नजर; कामगिरीचे मूल्यमापन सुरू

-मुख्यमंत्री कार्यालय ‘PMO’च्या धर्तीवर कार्यरत PS व OSD यांच्या कामावर थेट नजर सहकार व पणन खात्यावर विशेष लक्ष देण्याची मागणी
मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचा प्रभाव राज्यातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री कार्यालय (CMO) आता PMO (पंतप्रधान कार्यालय)च्या धर्तीवर अधिक काटेकोर, उत्तरदायित्वपूर्ण आणि पारदर्शक व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.
राज्य सरकारमध्ये मंत्र्यांच्या खाजगी सहाय्यक (PS) आणि विशेष कार्याधिकारी (OSD) यांच्या नियुक्त्या यापुढे केवळ शिफारशीनुसार होणार नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या पार्श्वभूमीची, वर्तणुकीची आणि प्रशासनातील अनुभवाची कसून तपासणी करूनच नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्यात ३५ PS आणि ९० OSD नियुक्त करण्यात आले असून, यापैकी काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका निर्माण झाल्याने त्यांची नियुक्ती थांबवण्यात आली आहे. याशिवाय, नियुक्त अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्या कामावर थेट मुख्यमंत्री कार्यालय नजर ठेवणार आहे.
CMO कडून प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जात असून, सत्तेचा गैरवापर, अकार्यक्षमता किंवा शिस्तभंग आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. काही अधिकाऱ्यांना मुंबईत निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्या कामावर वेळोवेळी अहवाल मागवला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर CMO कडून सहकार आणि पणन खात्यात विशेष लक्ष देण्याची मागणी होऊ लागली   आहे. या खात्याचे कामकाज अत्यंत संवेदनशील आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने, या खात्याचे मंत्री यांच्या PS आणि OSD यांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्री कार्यालयाने अधिक कठोर नजर ठेवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या प्रक्रियेमुळे मंत्र्यांच्या कार्यालयातील कामकाज अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रशासनात व्यावसायिकता आणि शिस्त वाढवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय भविष्यातील प्रशासन व्यवस्थेसाठी दिशादर्शक ठरू शकतो.
या कार्यपद्धतीची काही ठळक वैशिष्ट्ये:
-पारदर्शक व काटेकोर नियुक्त्या: कोणतीही नियुक्ती फक्त शिफारसीवर न करता, संबंधित अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी, वर्तणूक आणि प्रशासनातील अनुभव तपासून केली जात आहे.
-थेट कामगिरी मूल्यमापन: PS आणि OSD यांच्या कामावर CMO थेट नजर ठेवत आहे. कामात त्रुटी आढळल्यास तत्काळ बदल केले जातील.
-नियमित अहवाल प्रणाली: जसे PMO मध्ये सर्व मंत्रालयांकडून नियमित अहवाल घेतले जातात, तसाच सुसूत्र अहवाल सिस्टीम CMO ने तयार केला आहे.
-जबाबदारी आणि शिस्तीवर भर: सत्तेचा गैरवापर, अनधिकृत निर्णय किंवा राजकीय हस्तक्षेप यांना थारा नाही. कोणत्याही त्रुटीबाबत त्वरित कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.