माथाडी नेते नरेंद्र पाटील कामगार मंत्र्यांवर नाराज दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा

मुंबई: शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची येत्या दहा ते १५ दिवसांत सोडवणुक करण्याचे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री   आकाश फुंडकर Aaksh Fundkar यांनी   दिले होते. मात्र, त्यांच्याकडून प्रश्न तर सोडा एक बैठक सुद्धा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी नाराजी व्यक्त करत एक शिष्टमंडळासह आज निवेदन दिले . यावेळी त्यांनी सांगितले की कामगारांची समस्या सोडण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे   निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना   महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व माजी आमदार आणि महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी तातडीने संबंधित अधिका-यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यासंबंधी विनंती केली. 
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री   आकाश फुंडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या नरीमन पाँईट येथिल मुख्य कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता, त्यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी निवेदन सादर केले, यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णत पाटील, प्रशांत सणस उपस्थित होते. 
विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना संधी देणे, माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक 3 संदर्भात नियमावलीचे शासन जीआर पारीत करणे, विविध माथाडी मंडळातील कामगारांच्या दैनंदिन प्रश्नांची सोडवणुक होत नसल्यामुळे तातडीने उपाययोजना करणे, प्रत्येक माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रश्नांची ज्या-त्या माथाडी मंडळाच्या चेअरमन व सेक्रेटरी यांच्याकडून तातडीने सोडवणुक होणे, कामगार व मालकांच्या जबाबदा-या, चेअरमन व सेक्रेटरी यांच्या जबाबदा-या तत्परतेने पार पाडल्या जाव्यात, माथाडी कामगारांच्या मजूरी व लेव्ही वसुलीसंदर्भात असलेली प्रकरणे प्रलंबित आहेत ती निकालात काढावी, पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळ, ग्रोसरी लेबर बोर्ड, दि रेल्वे लेबर बोर्ड, कोल्हापूर माथाडी बोर्डातील नोंदीत माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणुक करावी, लातूर व धाराशिव माथाडी बोर्डाच्या चेअरमन यांनी माथाडी मंडळाच्या योजनेतील कलम 33 चे उल्लंघन करुन तुटपुंजी मजूरीवाढ केली आहे, त्यावर कारवाई करणे इत्यादी प्रश्नांचे निवेदन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचेकडे सादर करण्यात आले. 
यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले की, कामगार मंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून अनेक निवेदने सादर केली आहेत, परंतु अद्याप बैठका लावण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे म्हणून आतांतरी तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी आग्रही मागणी कामगार मंत्री   यांचेकडे केली.