पणन सबंधित सर्व घटकांनी कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी \
-राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पणन विभागाचे अधिकारी एकत्रितपणे काम करा
-राज्यामधील बाजार समित्यांचे अधिकारी, सचिव आणि पणन विभागाचे अधिकारी सर्व मिळून "स्मार्ट" काम करावे -स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेचा पुण्यात समारोप
पुणे - राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन विभागाचे अधिकारी आणि बाजार समित्यांचे अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने "स्मार्ट" काम करावे,त्याच्यातून राज्याची कृषी अर्थव्यवस्था मजबूत होईल हे करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. ते यशदा, पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. या समारोप कार्यक्रमास राज्याचे पणन संचालक विकास रसाळ, माजी पणन संचालक सुनिल पवार, प्रदीप गारोळे, संचालक, यशदा, पुणे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील आणि पणन संचालनालयातील अधिकारी उपस्थित होते.
राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प सुरु असून त्यामधील एका प्रकल्पाची अंमलबजावणी कक्ष पणन संचालनालया अंतर्गत सुरु आहे. या कक्षामार्फत राज्यामधील बाजार समित्यांचे अधिकारी, सचिव आणि पणन विभागाचे अधिकारी यांच्या क्षमता बांधणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, यशदा, पुणे येथे सुरु आहेत. दिनांक 06 जानेवारी पासून सुरु असलेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप दिनांक 10 जानेवारी संपन्न झाला. या समारोप प्रसंगी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकारी यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
मंत्री रावल यांनी सांगितलं की,देशातील महाराष्ट्र राज्य हे कृषी क्षेत्रात एक महत्त्वाचे राज्य आहे. शेतकऱ्याला शेती उत्पादन करणे फारसे अवघड नाही, मात्र उत्पादित केलेल्या शेतमालाची चांगल्या बाजारपेठेचा शोध घेऊन विक्री करणे अवघड आहे. पणन विभागाने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाच्या मूल्य साखळीमध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतमालाच्या उत्पादित मालाची नासाडी कमीत कमी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासाठी या प्रशिक्षण कार्यशाळेमधून मार्गदर्शन व्हावे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी सुधारणावर भर देण्याचे काम करत आहेत. त्यास साहाय्यभूत होणारे कामकाज करण्याची क्षमता बांधणी होण्यासाठी स्मार्ट प्रकल्पाच्या प्रशिक्षण कार्यशाळांचा उपयोग करून घ्यावा.’ असे त्यांनी यावेळी सांगितले राज्याच्या सर्व जिल्ह्यामधून या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी एकूण 98 अधिकारी उपस्थित होते. या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप गारोळे, संचालक, यशदा यांनी केले. राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी पणन विभागाला अतिशय अभ्यासू, उच्चशिक्षित आणि कुशल नेतृत्व मिळाले असून मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि विभागाचे अधिकारी एकत्रितपणे काम करून त्यांच्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करतील आणि त्यासाठी या प्रशिक्षण कार्यशाळांचा सकारात्मक फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. माजी पणन संचालक सुनिल पवार यांनीही पणन विभागाच्या चांगल्या कामकाजा संदर्भाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या प्रशिक्षण कार्यशाळेबाबत आखाडा बाळापूर आणि डहाणू बाजार समितीच्या सचिवांनी मनोगत व्यक्त केले. पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना पणन विभागाशी संबंधित अतिशय चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण प्रथमच स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून मिळत असल्याने समाधानी असल्याचे मनोगत सहायक निबंधक, कोरेगाव आणि उपनिबंधक, सहकारी संस्था, संगमनेर यांनी व्यक्त केले. प्रशिक्षण कार्यशाळेच्या या समारोप प्रसंगी पणनमंत्री रावल यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले...