खालापूर दुर्घटनाग्रस्तांना 5 लाखांची मदत,मोफत उपचार ,मोफत शिवभोजन थाळी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, पीठ, साखर देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची घोषणा
नबी मुंबई   | 20 जुलै 2023   : खालापूर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जणांना दरडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने खालापूरमधील इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सर्व काही दरड आणि पावसात वाहून गेलं आहे. किडूकडूकमिडूकही जवळ उरलं नसल्याने येथील गावकरी हतबल आणि हताश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत दुर्घटनाग्रस्तांना शिधा पुरवला जाईल, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली आहे.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले. दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार आहे. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय 5 लिटर रॉकेल, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील मोफत देण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तातडीने याबाबतचे आदेश दिले आहेत.
97 लोकांची ओळख पटली
इर्शाळवाडी येथे बचावकाय वेगाने सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जे लोक ढिगाऱ्याखालून काढले जात आहेत, त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत. आतापर्यंत 97 लोकांची ओळख पटली आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येणार आहे. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण घेता येत नाहीये, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.