हरभऱ्याचे उत्पादन वाढले; मात्र हमीभाव केंद्रावरील मर्यादेने शेतकरी हैराण
रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची उत्पादकता वाढणार हे निश्चित होते. शिवाय वाढत्या उत्पादनाला हमीभावाचा आधार मिळणार यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन निघणार याबाबत शेतकरी आशादायी होता. एवढेच नाही तर सर्वकाही नियोजनाप्रमाणे झाले होते. गेल्या 20 दिवसांपासून नाफेडच्यावतीने खरेदी केंद्रही सुरु करण्यात आली आहेत. मात्र, हेक्टरी 4 क्विंटलची उत्पादकता कृषी विभागाने ठरवली आणि येथेच सर्वकाही गणिते बिघडली. उत्पादन पदरी पडण्यापूर्वी कृषी विभागाकडून हेक्टरी पिकाची उत्पादकता ठरवली जाते आणि त्यानुसारच शेतीमालाची केंद्रावर विक्री करता येते. त्यानुसार जिल्ह्यात हरभऱ्याची उत्पादकता 4 क्विंटल ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रावर केवळ 4 क्विंटलच हरभरा खरेदी केला जात आहे. उर्वरीत हरभऱ्याचे करायचे काय? असा सवाल आहे.
अंदाजित उत्पादकता शेतकऱ्यांसाठी नुकासनीची
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कृषी विभागाने हरभऱ्याची उत्पादकता ठरवली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी केवळ 4 क्विंटलची उत्पादकता ठरविण्यात आली आहे. त्यामुळे हेक्टरी अधिकचे उत्पादन झाले तरी शेतकऱ्यांना केवळ 4 क्विंटलपर्यंतच हरभऱ्याची विक्री करता येणार आहे. उर्वरीत हरभऱ्याची विक्री ही खुल्या बाजारपेठेत करावी लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्र उभारुन सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशीच स्थिती निर्माण झाली आहे. यंदा कधी नव्हे रब्बी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढलेले आहे. पण नियम-अटींमुळे हरभऱ्याला हमी भावाचा आधार मिळत नसल्याचे चित्र आहे.
नोंदणी करुनही अडवणूकच
हरभऱ्याची खरेदी केंद्रावर विक्री करता यावी म्हणून शेतकऱ्यांकडून नोंदणी सुरु आहे. कागदपत्रांची पूर्तता करुन शेतकऱ्यांनी नोंदणी केली तरी केवळ 4 क्विंटल हरभऱ्याची विक्री शेतकऱ्यांना या केंद्रावर करता येणार आहे. उत्पादन वाढूनही अपेक्षित फायदा होताना दिसत नाही. कारण खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 600 रुपये प्रति क्विंटल असा दर आहे तर हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 हा दर ठरवून देण्यात आला आहे.
खुल्या बाजारपेठेतच आवक वाढली
‘नाफेड’ च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर हरभऱ्याला 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आलेला आहे. त्यामुळे खुल्या बाजारपेठेत आणि केंद्रावरील दरात जवळपास 800 रुपयांची तफावत आहे. असे असतानाही नियम-अटींमध्ये अडकून राहण्यापेक्षा शेतकरी खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याची विक्री करीत आहे. त्यामुळे दिवसाकाठी बाजार समितीमध्ये 15 ते 20 हजार पोत्यांची आवक होत आहे.