Navi Mumbai Crime-200 कोटींच्या कर्जाचे आमिष उद्योगपतीला सव्वा कोटींचा फटका

फसवे डिमांड ड्राफ्ट, बँक शिक्के, बनावट सही… चार फसवेखोरांविरोधात गुन्हा रबाळे एमआयडीसी पोलिसांचा तपास सुरु
नवी मुंबई | एपीएमसी न्यूज़ नेटवर्क 
एखाद्या मोठ्या उद्योगासाठी 300 कोटींच्या कर्जाची हमी देतो, असे सांगून एका ज्येष्ठ उद्योगपतीची तब्बल 1.25 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 78 वर्षीय उद्योगपतीला बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणाऱ्या टोळीने गंडवले. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू आहे.
फसवणूक झालेल्या उद्योगपतीशी डिसेंबर 2023 ते मार्च 2025 दरम्यान संपर्क साधण्यात आला होता. धनेश देशमुख, प्रमिला लाड, प्रशांत ऊर्फ राजू पिल्लई आणि पुष्पा गुप्ते अशी या चौघांची नावे असून, हे सर्व मुंबई व उपनगरांतील रहिवासी आहेत.
या आरोपींनी सुरुवातीला 100 कोटी, नंतर 200 कोटी रुपयांचे बिझनेस कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट डिमांड ड्राफ्ट, चेक, बँक शिक्के आणि खोटी सही असलेली कागदपत्रे ई-मेल, व्हॉट्सअॅप आणि कुरिअरद्वारे पाठवून उद्योगपतीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर ‘प्रोसेसिंग फी’, ‘प्रॉजेक्ट अॅप्रुव्हल’, ‘बँक गॅरंटी’, ‘स्टॅम्प ड्युटी’ अशा विविध कारणांनी एकूण 1.25 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करून घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही कर्ज मंजूर झाले नाही.
उद्योगपतीने कर्जाची चौकशी सुरू केली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर 28 जून 2025 रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, “अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी, बँक व्यवहार, बनावट दस्तऐवजांची सत्यता आणि आरोपींतील संबंध तपासले जात आहेत. आर्थिक फॉरेंसिक तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे.”
तसेच, या उद्योगपतीचा या फसवेखोर टोळीशी संपर्क कसा झाला, ‘म्युट्युअल कॉन्टॅक्ट’ कोण होता, याचा शोधही पोलीस घेत आहेत.
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
हा प्रकार पुन्हा एकदा अधोरेखित करतो की, कोणत्याही आर्थिक व्यवहारात विश्वास ठेवण्याआधी संपूर्ण खात्री करणे आवश्यक आहे. बनावट कर्ज संस्था, दलाल किंवा ‘फिनान्शियल एजन्सीज’ यांच्या भूलथापांना बळी पडू नये. कर्ज देणाऱ्या संस्थेचे RBI नोंदणी, प्रतिमा आणि कागदपत्रांची पूर्ण चौकशी करणे आवश्यक आहे.
जर कोणी थेट बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगत असेल, तर तो सायबर गुन्हा असण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रसंगी त्वरित स्थानिक पोलिसांशी किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.