अपेडाकडून प्रमुख कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ
कोविड महामारीनंतरच्या काळात अपेडाकडून प्रमुख कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली असून कृषी व प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. अपेडाच्या २७ प्रकारच्या वर्गवारीनुसार कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीपेक्षा २३.८ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली असून निर्यातीचे ६० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार असल्याचे अपेडाने म्हटले आहे.
२०२०-२०२१ वर्षातील एकूण कृषी निर्यात ४१.२५ अब्ज डॉलर्स एवढी होती. त्यातील अपेडाच्या माध्यमातून झालेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण ५० टक्के होते. त्याखालोखाल मरिन उत्पादनांची निर्यात १४ टक्के आणि मसाल्याच्या उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण १० टक्के होते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२१-२०२२ दरम्यान अपेडाच्या निर्यातीत २४.८६ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत अपेडाच्या निर्यातीचे प्रमाण १५.१६ अब्ज डॉलर्स एवढे होते. एप्रिल-डिसेंबर २०२२ दरम्यान मारिन उत्पादनांच्या निर्यातीत ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी या कालावधीतील मारिन उत्पादनांची निर्यात ६.१ अब्ज डॉलर्सवर होती.
२०१८ च्या मध्यावधीस भारताच्या कृषी निर्यात धोरणानुसार २०२२-२०२३ कृषी निर्यात दुप्पट (६० अब्ज डॉलर्स) करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबरपर्यंतच्या पहिल्या आठ महिन्यात निर्यातीची शक्यता जास्त असणाऱ्या टॉप टेन कृषी उत्पादनांपेक्षा इतर कृषी उत्पादनांची निर्यात अधिक झालेली दिसते आहे.
आपली कृषी उत्पादने घेणाऱ्या देशांच्यादृष्टीने आपल्याकडे कृषी उत्पादनांची विविधता उपलब्ध आहे, ही चांगली गोष्ट आहे. भविष्यात या मुद्यावरही आपल्याला लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे अपेडाचे अध्यक्ष एम.अंगमुथू यांनी म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात बासमती, बिगर बासमती, बफेलो मीट, भुईमूग, प्रक्रिया केलेली फळे व भाजीपाला, मका, कांदा, फळांचा रस व नट्स अशी टॉप टेन उत्पादने प्राधान्याने निर्यात करण्यात आली.
एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान या टॉप टेन उत्पादनांची निर्यात १३.३ टक्क्यांच्या वाढीसह ११.१६ अब्ज लर्सवर पोहचली आहे. एकूण निर्यातीत त्यांचा वाटा ७१ टक्के राहिला. गेल्या वर्षी या कालावधीत एकूण निर्यातीमधील टॉप टेन उत्पादनांच्या निर्यातीचा वाटा ८१ टक्के होता. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात टॉप टेन उत्पादनांची निर्यात ३१.४ टक्क्यांच्या वाढीसह १६.२६ अब्ज डॉलर्सवर पोहचली होती.
गेल्या वर्षातील कृषी उत्पादनांच्या निर्यातवाढीबद्दल अंगमुथू म्हणाले की, २०१९-२०२० या आर्थिक वर्षात कृषी उत्पादनांची निर्यात (Agriculture Export)१९ अब्ज डॉलर्सवरून घसरत १६.७ अब्ज डॉलर्सवर पोहचली होती. म्हणजे कृषी उत्पादनांच्या निर्यातीचा ग्राफ तसा घसरला होता.
त्यादरम्यान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खाद्य पदार्थांच्या मागणीत मात्र सातत्याने वाढ दिसत होती. त्यामुळे आपल्या उत्पादनांच्या निर्यातवाढीत सातत्य राखण्याचे आव्हान होते, त्यानुसार आपण केलेले नियोजन फायदेशीर ठरले. उर्वरित कालावधीतही कृषी उत्पादनांच्या निर्यातीत अशीच वाढ होत राहील, असा विश्वास अंगमुथू यांनी व्यक्त केला आहे.
(एप्रिल ते नोव्हेंबर) दरम्यान भारताच्या कृषी उत्पादनांची निर्यात कोणत्या देशात कशी राहिली? याबाबत सांगताना अंगमुथू म्हणाले की, टॉप टेन आयातदार देशांपैकी सौदी अरेबिया, हॉंगकॉंग, इराण आणि इराक या चार देशांत भारतीय उत्पादनांच्या निर्यातीस फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
अमेरिका, नेपाळ, बांग्लादेश, मलेशिया, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती या उर्वरित सहा देशांत भारतीय कृषी उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सहा देशांतील कृषी उत्पादनांची निर्यात तिप्पटीने वाढली आहे. या देशांतील कृषी उत्पादनांची निर्यात १.८७ अब्ज डॉलर्सवरून ५२४.६१ दशलक्ष डॉलर्सवर गेली असल्याचेही अंगमुथू म्हणाले आहेत.