अवकाळीचा हळदीला फटका; शेतकरी हवालदिल
बागायती भागातील महत्त्वाचे पीक असलेल्या हळदीला यंदा अतिवृष्टीचा फटका बसल्याने उत्पादनात मोठी घट येत आहे. एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन येण्याच्या ठिकाणी सात ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन निघत आहे. बियाणे म्हणून बंडाचा वापरा होतो. परंतु काढणीदरम्यान एकच बंडा व हळदीच्या दोन शेंगा निघत असल्याने उत्पादन कमालीची घट झालेली दिसत आहे. यामुळे यंदा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात पंचवीस हजार हेक्टरवर हळद लागवड आहे. मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला. पाऊस जास्त झाल्याने कंद जमिनीत सडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाले. पिकाची वाढ चांगली झालेली दिसत असली तरी लागवड करताना वापरलेले हळदीचे बेणही निघत नसल्याचे चित्र दिसत आहे. काही भागात तर नुकसानीचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादनात ७० ते ७५ टक्के घट येत आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते. या काळात बाजारपेठा बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल दर मिळाला. यातून हळद उत्पादक शेतकऱ्यांचे लाखांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची मदार हळदीवर होती. मात्र हळदीनेही यंदा दगा दिल्याने केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हळदीला विमा कवच नसल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. भविष्यात हळदीचा भावात तेजी येण्याची शक्यता आहे. मागील वर्षांमध्ये शिल्लक ठेवलेल्या हळदीला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने नवीन हळदीला चांगला भाव मिळेल म्हणून अनेक शेतकरी हळद काढणीसाठी धावपळ करीत आहेत. परंतु उत्पादन कमी येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
यंदा अतिवृष्टीमुळे जमिनीतून पाण्याचा निचरा झाला नाही. परिणामी, हळदीचे कंद जमिनीत सडून त्यात अळी तयार झाली. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांसह मजूरांना बसत आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्यामुळे जिल्ह्यात मागील काही वर्षांत हळदीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात पंचवीस हजार हेक्टरवर असलेल्या हळदीला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला. परिणामी, उत्पादनात घट येत आहे.