शेतकरी ते ग्राहक अंतर होणार कमी; FPO शेतकरी उत्पादक कंपनीची महत्त्वाची भूमिका
शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आता भारतीय कृषी संशोधन संस्थेने उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी दोन एकर परिसरात पुसा कृषी हाट विकसीत केला जाणार आहे. यामध्ये 60 स्टॉलची उभारणी केली जाणार आहे. या सुविधेमुळे शहरी ग्राहकांना थेट शेतकऱ्यांची उत्पादने खरेदी करता येणार आहेत. यामुळे मध्यस्ती असणारे दलाल बाजूला होणार असून थेट शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी केल्याने कमी दरात माल मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तर होणारच आहे पण ग्राहकांनाही चांगल्या दराचा शेतीमाल मिळणार आहे. शिवाय कोणताही शेतकरी आपला माल विकण्यासाठी येथे येऊ शकतो. यामध्ये (FPO) शेतकरी उत्पादक कंपनीची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत आहेत.
14 लाख एकरात पुसाच्या वाणाचा वापर
भारतीय कृषी संशोधन संस्थेने भाताच्या पेंढा जाळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी विकसित केलेल्या ‘पुसा डिस्ट्रिस्टर’ या बुरशीजन्य कन्सोर्टियमचे उत्पादन आता खासगी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर करीत आहे. यावेळी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत 14 लाख एकर क्षेत्रात पेंढा व्यवस्थापनासाठी याचा वापर करण्यात आला.एआरआयचे संचालक डॉ. सिंग यांनी सांगितले की, 2021 मध्ये या संस्थेने विविध पिकांचे 25 नवीन वाण विकसित केले आहे. यामध्ये भाताच्या पाच जाती, गहू आणि मका प्रत्येकी दोन, बेबीकॉर्न, मोहरी, हरभरा आणि सोयाबीनच्या प्रत्येकी एका जातीचा समावेश आहे.
शेतीमालाच्या खरेदीसाठी केंद्रीय मंत्र्यांचा ‘एफपीओ’ शी संवाद
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर हे आज(बुधवारी) शेतकरी उत्पादक कंपन्यांशी थेट शेतीमाल खरेदीच्या अनुशंगाने संवाद साधणार आहेत. आजच कृषी मेळाही कॅम्पसमध्ये सुरू होणार असून तो 11 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.’तांत्रिक ज्ञान असलेले स्वावलंबी शेतकरी’ असा या मेळाव्याचा विषय असेल. स्मार्ट शेती, डिजिटल शेती, कृषी स्टार्टअप, एफपीओ, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, संरक्षित शेती, हायड्रोपोनिक, एरोपोनिक व उभी शेती हे कृषी मेळ्याचे प्रमुख आकर्षण असेल, यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा मंत्र मिळणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विज्ञान केंद्र, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इतर संस्थांच्या विविध संस्थांच्या प्रगत तंत्रांचेही प्रदर्शन केले जाणार आहे.
पुसा शेतकऱ्यांचे काम सोपे करणार
मायक्रोबायोलॉजी विभागाने बायो-फर्टिलायझर ‘पुसा होल’ नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम पुरविणारे एक अद्वितीय लिक्विड फॉर्म्युलेशन विकसित केले आहे, अशी माहिती भारतीय कृषी संशोधन संस्थेने दिली आहे. यामुळे बियाण्यांची उगवण सुधारते, ज्यामुळे चांगल्या वनस्पती आणि चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे भविष्यात शेती व्यवसय हा पुसा संस्थेमुळे अधिकच सोईस्कर होणार आहे.