या वर्षीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ शेतकऱ्यांच्या पथ्यावर
कोरोनाने ओढावलेल्या परस्थितीचा परिणाम सर्वंच घटकांवर झाला असून गेल्या दोन वर्षात सण, उत्सव साजरे केले जात नव्हते. त्यामुळे इतर पाश्चात्य संस्कृतीतून आलेले विविध 'डे' देखील साजरे केले जात नव्हते. देशाअंतर्गत बाजारपेठेत उठाव नव्हताच तर निर्यातही बंद होती. त्यामुळे गुलाब फुलांच्या मागणीत मोठी घट झाली होती. परिणामी फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मात्र, यंदा व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने गुलाबची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली आहे. त्यामुळे मावळच्या गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्येही सुगीचे दिवस आले आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी गुलाब फुलाला महत्व असते. या दिवसाचेचे मुहूर्त साधून मावळच्या प्रांतातल्या शेतकऱ्यांनी गुलाबाची जोपासणा केली होती. योग्य नियोजन आणि परिश्रमाच्या जोरावर गेल्या दोन वर्षात झालेले नुकसान भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस होता. त्याच अनुशंगाने गुलाबाची निर्यात करण्यात आली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी मावळ मधून परदेशात सुमारे एक कोटी तर देशांतर्गत बाजारपेठेत सुमारे दीड कोटी अशी एकूण अडीच कोटी गुलाबाची फुले विक्रीसाठी पाठवण्यात आलीय व त्यातून तब्बल ४० ते ४५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ मुळे परदेशातूनही गुलाब फुलांची मागणी होते. त्यानुसार यंदा मावळमधून १ कोटी गुलाब फुलांची निर्यात करण्यात आली आहे. मात्र, दराचा विचार केला तर स्थानिक बाजारपेठच सरस ठरत आहे. कारण निर्यात करण्यात आलेल्या गुलाबाला १३ ते १४ रुपये प्रति नग असा दर आहे तर स्थानिक बाजारपेठेत एका गुलाबाला १५ ते १६ रुपये मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे गुलाब मागणीमध्ये निम्म्याहून अधिकची घट झाली होती. यंदा प्रादुर्भाव कमी होताच मागणी वाढली असून दरही चांगला मिळाला अन् शेतकऱ्यांना याचा फायदाही अधिक प्रमाणात झाला आहे.