जीआय मानांकन हापूसच्या खरेदी विक्रीसाठी अनोखा उपक्रम
भौगोलिक मानांकन प्रदान झालेल्या पिकांना एक वेगळेच महत्व असते. त्याच्या गुणवैशिष्टांमुळे त्याचा एक दर्जा ठरलेला असतो आणि त्यानुसारच त्याला दरही मिळतो. मात्र, काळाच्या ओघात जीआय मानांकनाच्या नावाखाली कोणतेही पीक ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. मध्यंतरी कोकणलगच्या भागातून असे प्रकार मुंबईमध्ये वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. पण आता केवळ जीआय मानांकन असलेल्याच हापसूला महत्व राहणार आहे. कारण अशाच आंब्याची खरेदी एका कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याचा फायदा हा बागायतदार यांना तर होणारच आहे पण ग्राहकांना देखील दर्जेदार हापूस चाखायला मिळणार आहे. या अनोख्या पध्दतीचा ग्राहक नेमका लाभ कसा घेणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देवगज आंबा उत्पादक संघ आणि इनोटेरा कंपनीच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे.
जीआय मानांकन हापूस आंब्याची खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र ही उभारली जाणार आहेत. यामाध्यमातून शेतकऱ्यांना आपला आंबा हा विकता येणार आहे. एवढेच नाही तर यामध्ये क्युआर कोडचा वापर होणार आहे. यामुळे आंबा खरोखरच मानांकन मिळालेला आहे का? कुणाच्या शेतामधील आणि कुणाच्या मालकीचा आहे याची माहिती थेट ग्राहकालाच होणार आहे. कारण हापूसच्या पेटीवर मानांकन मिळाल्याचे पत्रच लावण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांचीही फसवणूक होणार नाही आणि शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळणार आहे.
उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर आंब्याचा दर्जा हा तपासलाच जाणार आहे. याकरिता स्कॅनिंग केले जाणार आहे. यामुळे आंब्यातील साक्याचे प्रमाण किती आहे हे स्पष्ट होणार आहे. हे तपासणी झाल्यानंतर एकाच ब्रॅंण्डखाली हे आंबे विकले जाणार आहेत. त्यामुळे अधिकच्या दराचा फायदा थेट शेतकऱ्यांना आणि संबंधित कंपनीला देखील होणार आहे. या पध्दतीमुळे मानांकनाच्या नावाखाली होणाऱ्या विक्रीला आळा बसणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
हापूस आंब्याची शेतकऱ्यांना विक्री करता यावी म्हणून तालुक्यात 11 ठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहेत. अधिक करुन मंडळाच्या गावी हे केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूकीचा खर्च वाचला असून आता मानांकन प्राप्तच हापूसला अधिकचे महत्व येणार आहे. त्यामुळे चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यंदाचा हा उपक्रम नवखा असला तरी भविष्यात याचे फायदे लक्षात आल्यावर महत्व वाढणार आहे.