राज्यातील शेतकरी व प्रामाणिक व्यापाऱ्यांना अच्छे दिन, APMC होणार डिजिटल : शरद जरे, पणन संचालक
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
राज्यातील शेतकरी व प्रामाणिक व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे दिसू लागली असून, बाजार व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. राज्यातील तब्बल ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना शिस्तबद्ध व डिजिटल करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुंबई APMCचे सचिव शरद जरे यांची पणन संचालक पदावर नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे APMC प्रशासकीय इमारतीत भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या समारंभात शरद जरे यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना शरद जरे म्हणाले, “तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत बाजार समितीचे उत्पन्न वाढवले, त्याच जोमाने पुढेही काम करा. सर्व बाजार घटकांना उत्तम सेवा द्या आणि कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडा.” तसेच, शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळावा यासाठी ठोस उपयोजना सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाजार व्यवस्थापन अधिक पारदर्शक, आधुनिक आणि शेतकरी-केंद्रित करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासगी बाजार व थेट पणन व्यवस्थेची तपासणी
राज्यात खासगी बाजार आणि थेट पणन परवान्यांद्वारे होणाऱ्या व्यवहारांची तपासणी करण्याच्या सूचना जरे यांनी दिल्या आहेत. या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना खरोखरच फायदा होतो आहे का, याचा आढावा जिल्हा उपनिबंधकांमार्फत घेतला जाणार आहे.
सोयाबीन-कापूस खरेदी केंद्रांवर भर
राज्यात सोयाबीन व कापूस खरेदी केंद्रांवर विक्री वाढविण्यावर भर दिला जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना थेट व पारदर्शक व्यवहाराची संधी मिळेल.
बोगस अडत्यांवर धडक कारवाई
मुंबई व पुणे APMCमध्ये परवाना नसताना बाजार आवारात शेतमाल विक्री करणाऱ्या बोगस अडत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई APMCतील भाजीपाला व फळ मार्केटमध्ये सध्या बिना परवाना धारकांवर पंचनामा सुरू असून पॅसेज, धक्के याठिकाणी शेतमाल व खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
हीच मोहीम पुणे तसेच इतर बाजार समित्यांमध्येही राबविण्यात येणार आहे.
धोकादायक मार्केट व रखडलेले प्रकल्प सुरू होणार
मुंबई APMCमधील व्यापारी व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन कांदा-बटाटा मार्केट, मसाला मार्केटसारख्या अति धोकादायक इमारती तसेच रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जरे यांनी दिली.
डिजिटल आणि शिस्तबद्ध बाजार व्यवस्थेकडे वाटचाल
मुंबई APMCच्या धर्तीवरच इतर सर्व बाजार समित्यांमध्ये शिस्तबद्धता आणि डिजिटलायझेशन लवकरात लवकर लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आयटी व तज्ज्ञांची भरती, खर्चावर नियंत्रण
समित्यांच्या स्टाफिंग पॅटर्नमध्ये आयटी, कृषी व अन्न प्रक्रिया तज्ज्ञांना कंत्राटी पद्धतीने संधी देण्यात येणार आहे. तसेच अनावश्यक खर्चावर कात्री लावत उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
एकूणच, शेतकरी हित, पारदर्शकता आणि आधुनिकतेच्या दिशेने बाजार समित्यांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी शरद जरे यांची नियुक्ती निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.