BREAKING: पणन संचालकपदी बाजीराव शिंदे शरद जरे पुन्हा मुंबई APMC सचिवपदी
जरे यांच्या कार्यकाळात बाजार समित्यांमध्ये शिस्त आता शिंदेंकडूनही कडक कारवाईची अपेक्षा
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
राज्याच्या पणन संचालनालयात मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला असून, प्रभारी पणन संचालक म्हणून कार्यरत असलेले शरद जरे यांच्या जागी बाजीराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शरद जरे यांच्याकडे पुन्हा मुंबई APMC सचिव पदाचा कार्यभार राहणार आहे.
शरद जरे यांनी प्रभारी पणन संचालक म्हणून कार्यरत असताना राज्यातील बाजार समित्यांच्या कारभारात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला होता. विशेषतः शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी, बिनपरवाना शेतमाल विक्री करणाऱ्यांवर कारवाई, तसेच बाजार समित्यांमधील भेसळीच्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका चर्चेत राहिली.
राज्यातील आंबा, फळ, भाजीपाला, मसाला आणि कडधान्य बाजारांमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात कठोर कारवाईचे आदेश देत जरे यांनी अनेक ठिकाणी प्रशासनाला सतर्क केले होते. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात शिस्त निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आता नवीन पणन संचालक म्हणून कार्यभार स्वीकारणारे बाजीराव शिंदे यांच्याकडूनही बाजार घटक आणि शेतकरी वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत. बाजार समित्यांमधील अनियमितता, भेसळ, बेकायदा व्यापार आणि शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर शिंदे कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, बाजीराव शिंदे यांना सहनिबंधक सहकारी संस्था गट-अ पदावरून अपर निबंधक सहकारी संस्था गट-अ पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची पणन संचालनालय, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली.
सध्या ते महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित), मुंबई येथे सहनिबंधक (नोंदणी) म्हणून कार्यरत होते. शासनाने ही नियुक्ती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून केल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.