NMMCच्या धोकादायक इमारतींच्या यादीत मुंबई APMCची मध्यवर्ती ‘सी-१’ इमारत; कांदा-बटाटा व मसाला मार्केटमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
APMC प्रशासनाचे कार्यालयही धोक्यात दरवर्षी नोटिसा बजावल्या जातात, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना अद्यापही रखडल्या
मसाला मार्केटमधील धोकादायक इमारतीच्या परिसरात कार्यालये, हॉटेल व ज्यूस सेंटर सुरूच महापालिकेच्या कारवाईवर दिखाव्याचा आरोप
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क :
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) म्हणजे राज्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक. दररोज कोट्यवधींची उलाढाल, हजारो व्यापारी आणि लाखो ग्राहकांची वर्दळ असलेल्या या बाजारात आता इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या २०२६-२७ च्या धोकादायक इमारतींच्या यादीत एपीएमसी परिसरातील अनेक महत्त्वाच्या इमारतींचा समावेश करण्यात आला आहे.
यंदाच्या यादीतील सर्वात गंभीर बाब म्हणजे मसाला मार्केटमधील मध्यवर्ती इमारत. ‘शिकागो प्रकार-२, बाजार-२’ म्हणून ओळखली जाणारी ही इमारत अतिधोकादायक अर्थात ‘सी-१’ श्रेणीत टाकण्यात आली असून ती तात्काळ रिकामी करून पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या इमारतीची अवस्था अत्यंत जर्जर झाल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय एपीएमसीचे प्रशासकीय   कार्यालय, भाजीपाला मार्केटमधील इमारत तसेच फळ मार्केटमधील जी-३११ आणि जी-३१२ गाळ्यांचा ‘सी-२ अ’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या इमारतींना तातडीची संरचनात्मक दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ज्या प्रशासकीय कार्यालयात सभापती, संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकारी महत्त्वाच्या बैठका घेतात, तेच कार्यालय धोकादायक यादीत आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कांदा-बटाटा मार्केटमधील सेक्टर-१८ परिसरातील काही गाळे, राम लक्ष्मण कमर्शियल सोसायटी, श्रीराम कोल्ड स्टोरेज, इम्रान एन्टरप्रायझेस आणि चिराग कोल्ड स्टोरेज यांसारख्या व्यापारी इमारतींना ‘सी-२ ब’ श्रेणीत ठेवण्यात आले असून किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एपीएमसीतील इमारती धोकादायक घोषित होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विविध बाजार विभागांतील इमारतींचा दरवर्षी धोकादायक यादीत समावेश होत आहे. नोटिसा, स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्तीच्या सूचना दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची व्यापाऱ्यांची तक्रार आहे.सध्या या मसाला मार्किट इमारतीच्या परिसरात जूस सेंटर ,मर्चेंट चेंबर कार्यालय ,होटल बिनधास्तपणे सुरू आहे.
विशेषतः कांदा-बटाटा मार्केटमधील इमारती गेली दोन दशके अतिधोकादायक स्थितीत आहे. संचालक मंडळाच्या बैठका, व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता घेतले जाणारे निर्णय आणि रखडलेली पुनर्रचना यामुळे बाजारातील असंतोष वाढत असल्याचे बोलले जात आहे.
दररोज मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी, मालवाहतूक, जुन्या इमारती आणि वाढते अतिक्रमण यामुळे एपीएमसी परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे यंदातरी बाजाराच्या पुनर्रचनेबाबत ठोस निर्णय घेतला जाणार का, याकडे व्यापारी आणि बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेने अतिधोकादायक इमारतींचा वापर तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या असून नियमांचे पालन न झाल्यास भविष्यातील दुर्घटनांची जबाबदारी संबंधित मालक आणि व्यवस्थापनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.