मुंबई APMC फळ मार्केटमध्ये जरे यांची धडक कारवाई कमी बिल घोटाळा उघड, लाखोंची अतिरिक्त वसुली!
गेटवर सेस तपासणीमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
आंबा हंगामात मोठा भांडाफोड! कमी गेट पासद्वारे महसूल बुडवण्याचा प्रकार उघड
मुंबई APMC मध्ये ‘लो बिलिंग’वर लगाम एका दिवसातच २ लाखांची अतिरिक्त वसुली
थेट बाजार फी वसुलीमुळे बाजार समितीला तब्बल ३५० कोटींच्या नुकसानीचा अंदाज फळ मार्केटमध्ये प्रशासनाची कडक मोहीम सुरू
प्रायोगिक तत्वावर थेट वसुली बंद करून आकारणी सुरू करा बाजार घटकांची मागणी
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क :
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये सचिव व पणन संचालक शरद जरे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई सुरू असून गेटवर सेस तपासणी कडक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कमी बिल देणारे व्यापारी आणि वाहतूकदार यांचे   चांगले धावे दणाणले आहेत.
बाजार समितीतील शिस्तबद्ध कारभार आणि उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने प्रशासनाने भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये विशेष मोहीम राबवली आहे. सध्या आंब्यासह विविध फळांचा हंगाम सुरू असून १० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत शेतमालाची विक्री होत असतानाही बाजार समितीला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
तपासणीदरम्यान व्यापारी, वाहतूकदार आणि काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कमी दराचे गेट पास तयार करून महसूल बुडवला जात असल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला. एका प्रकरणात ११७ कॅरेट आंबा माल असताना फक्त ७० कॅरेटचा गेट पास तयार करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर १४० रुपये किलो बाजारभाव असलेला आंबा केवळ ७० रुपये दाखवण्यात आल्याचेही समोर आले. संबंधित गाडी जप्त करून पंचनामा करण्यात आला असून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय, एका व्यापाऱ्याने १ डझन मालाचे ५०० रुपयांचे बिल तयार केले होते मात्र तपासणीत तो प्रकार उघड झाल्यानंतर त्याच्याकडून १००० रुपये सेस वसूल करण्यात आला. जास्त माल देऊन कमी गेट पास बनवणे, लूज मालात वजन कमी दाखवणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.
दरम्यान, फळ मार्केटच्या जावक गेटवर सेस तपासणी कडक केल्याचा परिणाम दिसू लागला असून केवळ एका दिवसातच तब्बल २ लाख रुपयांची अतिरिक्त सेस वसुली झाली आहे. यावरून असे दिसून येत आहे की थेट बाजार फी वसुली मूळ आतापर्यंत बाजार समितीला सुमारे ३५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर सहसचिवांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा जावक गेटवर तैनात करण्यात आली आहे. तसेच प्रायोगिक तत्वावर थेट बाजार फी वसुलीऐवजी आकारणी पद्धत सुरू करण्याचा विचार सुरू असून व्यापाऱ्यांच्या दफ्तरी तपासणीमुळे उत्पन्नात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.