मुंबई APMC फळ मार्केटमध्ये अभियंता विभागाचा भोंगळ कारभार; १.६३ कोटी मंजूर तरी काम रखडले
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये उप अभियंता-कार्यकारी अभियंत्याच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश
फळ मार्केटच्या धोकादायक पॅसेजकडे दुर्लक्ष १.६३ कोटींची मंजुरी मिळूनही वर्षभर काम रखडले
प्लास्टर कोसळून मृत्यू उप अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
वॉटरप्रूफिंगशिवाय दुरुस्तीचा घाट व्यापाऱ्यांनीच प्रशासनाला शिकवली प्रक्रिया
व्यापाऱ्यांनी घेतली उप अभियंत्याची शाळा त्यानंतर प्रशासनाला आली जाग
संबंधित उप अभियंता प्रत्यक्ष कामांपेक्षा “मला कार्यकारी अभियंता करा” यासाठी अधिक सक्रिय
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमधील ६ विंगमधील कॉमन पॅसेजची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून व्यापारी, ग्राहक आणि कामगार जीव मुठीत धरून ये-जा करत आहेत. अनेक ठिकाणी छताचे प्लास्टर कोसळत असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून दुरुस्तीला विलंब होत असल्याने काही व्यापाऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने पॅसेजची डागडुजी सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, या कॉमन पॅसेज दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी ६३ लाख रुपयांची मंजुरी मिळून एक वर्ष उलटले, तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. ६ विंगच्या दोन्ही बाजूंतील सामायिक पॅसेजच्या छताची दुरुस्ती अद्याप रखडलेली आहे.
व्यापाऱ्यांच्या आरोपानुसार, फळ मार्केटच्या उप अभियंत्यांनी छताच्या वरच्या भागातील वॉटरप्रूफिंगचे काम न करता केवळ खालच्या भागाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पणन विभागाकडे पाठवला होता. त्याला कार्यकारी अभियंत्यांनीही हिरवा कंदील दिल्याचा आरोप होत आहे. मात्र ही माहिती समोर आल्यानंतर व्यापाऱ्यांनी अभियंता विभागालाच “पहिले वॉटरप्रूफिंग करा, मग खालची दुरुस्ती करा,” अशी शाळा शिकवल्याची चर्चा मार्केटमध्ये रंगली आहे.
दरम्यान, संबंधित उप अभियंता प्रत्यक्ष कामांपेक्षा “मला कार्यकारी अभियंता करा” यासाठी अधिक सक्रिय असल्याची चर्चा एपीएमसी वर्तुळात सुरू आहे. पदोन्नतीसाठी त्यांनी मंत्र्यांपासून न्यायालयापर्यंत धावपळ सुरू ठेवली, मात्र फळ मार्केटमधील धोकादायक पॅसेजच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.
व्यापाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने घाईघाईने वरच्या भागाच्या वॉटरप्रूफिंगच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याची माहिती आहे. मात्र हे कामही तातडीने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
उप अभियंत्यांच्या भोंगळ कारभारामुळे कॉमन पॅसेजवरील प्लास्टर वारंवार कोसळत असून यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संबंधित उप अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला जात नाही, असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.