उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आठवणींनी मुंबई एपीएमसीत शुकशुकाट
फळ-भाजीपाला बाजार बंद ठेवून बाजार घटकांकडून श्रद्धांजली
अजित पवार यांच्या स्मरणार्थ येत्या शनिवारी माथाडी भवन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC ) गजबजलेल्या भाजीपाला व फळ बाजारात गुरुवारी पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळाला. रोज पहाटेपासून सुरू होणारी घाऊक व्यवहारांची लगबग, माथाडी कामगारांचा गोंगाट आणि व्यापाऱ्यांची धावपळ-या साऱ्यावर शोकाची छाया पसरलेली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने एपीएमसीतील वातावरण सुन्न झाले होते. त्याच भावनेतून गुरुवारी फळ व भाजीपाला बाजार पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय बाजार घटकांनी घेतला.
दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होणारा फळ व भाजीपाला बाजार गुरुवारी ठप्प होता. संपूर्ण बाजारपेठेत निरव शांतता पसरली होती. मुंबई एपीएमसी ही केवळ व्यापारी व्यवहारांची जागा नसून, हजारो व्यापारी, आडते आणि माथाडी कामगारांच्या उपजीविकेचा आधार आहे. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी एपीएमसी ही सहकार चळवळीचे महत्त्वाचे प्रतीक मानली जाते.
या व्यवस्थेशी अजित पवार यांचे नाते प्रशासकीय मर्यादांपलीकडे जाऊन आपुलकीचे आणि कौटुंबिक होते, अशी भावना व्यापारी, आडते आणि माथाडी कामगारांमध्ये प्रकर्षाने दिसून आली. बाजारातील अनेक प्रश्नांवर त्यांनी थेट हस्तक्षेप करून तोडगे काढले, कामगारांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली-या आठवणींना बाजार घटकांनी उजाळा दिला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसत होते.
बुधवारी अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच मसाला-धान्य तसेच कांदा-बटाटा बाजार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी भाजीपाला व फळ बाजारातील व्यापाऱ्यांनीही आपला शोक व्यक्त करण्यासाठी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आर्थिक नुकसानीचा विचार न करता, भावनिक पातळीवर घेतल्याचे व्यापारी आणि संचालकांनी सांगितले.
एपीएमसी नवी मुंबईत स्थलांतरित झाल्यानंतर माथाडी कामगारांचे प्रश्न, निवासाची समस्या तसेच बाजारातील पायाभूत सुविधांसाठी अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांचे निधन म्हणजे घरातील आधारवडील गेल्यासारखी भावना माथाडी कामगारांमध्ये व्यक्त होत आहे.
‘दादांच्या जाण्याने मोठा आधार हरपला’ - माथाडी नेते नरेंद्र पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचे संबंध अनेक वर्षांचे होते. त्यांच्या अपघाती निधनाने नरेंद्र पाटील भावुक झाले. पाटील यांनी सांगितले, “दादांचे जाणे म्हणजे माथाडी कामगारांचा मोठा आधार हरपणे होय. आमचे राजकीय पक्ष वेगळे असले तरी माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत अजित पवार नेहमीच पुढाकार घेऊन काम करत होते. त्यांनी कधीही कोणावर भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांच्या जाण्याने कामगारांच्या आयुष्यात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.”
दरम्यान, अजित पवार यांच्या स्मरणार्थ येत्या शनिवारी माथाडी भवन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.