काम करा नाहीतर घरी जा! — पणन संचालक शरद जरे Action Mode मध्ये, 28 कर्मचाऱ्यांना मेमो, पणन विभागात खळबळ
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: राज्याच्या पणन विभागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कामचुकार अधिकाऱ्यांवर आता कडक कारवाई सुरू झाली आहे.”
पुणे येथील राज्याच्या पणन विभागात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी पणन संचालक “शरद जरे”(Maharashtra marketing director) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, कामचुकारपणावर मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील पणन संचालनालयात प्रथमच २८ कर्मचाऱ्यांना मेमो बजावण्यात आले असून, “आपल्या कामात सुधारणा करा, अन्यथा घरी जा” असा स्पष्ट इशारा जरे यांनी दिला आहे.
राज्यातील ३०७ बाजार समित्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पणन संचालनालयात कामकाजातील हलगर्जीपणा, सतत गैरहजेरी आणि उशिरा येण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची गंभीर दखल घेत शरद जरेयांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईमुळे विभागात चांगलीच खळबळ उडाली असून, कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकताच शरद जरे यांनी पणन संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी धडक कारभार सुरू केला आहे. त्यांच्या या कठोर निर्णयामुळे विभागात शिस्त वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर पणन संचालनालयातील कामकाजात सुधारणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.