कांदा उत्पादकांना केंद्राचा दिलासा; बफर स्टॉक खरेदीचा दर ₹2,125 प्रति क्विंटल
कांदा उत्पादकांना केंद्राचा मोठा दिलासा बफर स्टॉक खरेदीचा दर प्रतिक्विंटल ₹2,125, 4 जुलैपासून नवे दर लागू
किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत खरेदी दरात 13 टक्क्यांची वाढ शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ₹250 अधिक मिळणार
लासलगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. किंमत स्थिरीकरण निधी (Price Stabilisation Fund) अंतर्गत महाराष्ट्रातील कांदा खरेदीचा दर प्रतिक्विंटल ₹1,875 वरून ₹2,125 करण्यात आला आहे. सुधारित दर शनिवार, 4 जुलै 2026 पासून लागू करण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ₹250 अधिक मिळणार आहेत.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या संचालक शिवानी गोयल यांनी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. राष्ट्रीय कांदा बफर स्टॉक उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या खरेदीसाठी हा नवीन दर लागू करण्यात आला आहे.
नवीन दर हा पूर्वीच्या दराच्या तुलनेत सुमारे 13 टक्क्यांनी अधिक असल्याने कांदा उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
या निर्णयामुळे बाजारातील कांद्याच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.