Chana Procurement :हरभरा खरेदी सुरू होणार की नाही संभ्रम कायम
१) आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस सुधारला (Cotton Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. दुपारपर्यंत कापसाचे वायदे ८३.६३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशात मात्र कापसाचा बाजार सुस्तच आहे. आजही कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपये भाव मिळाला.
बाजारातील आवक जास्त असल्याचा दबाव जाणवतो. मात्र पुढील काळात कापसाची आवक (Cotton Arrival) कमी होऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीनची आवक कायम (Soybean Arrival)
देशातील बाजारात सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होत आहे. सोयाबीन आवक सरासरी दोन लाख टनांच्या दरम्यान होतेय. त्यामुळं सोयाबीन दरही स्थिर दिसतात. सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये दर मिळतोय.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात (Soyameal Rate) सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४६८ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते.देशातील बाजारात सोयाबीनला मागणी चांगली असल्यानं पुढील काळात दर सुधारू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) शेवग्याचे भाव नरमले
शेवग्याच्या दरात मागील काही दिवसांपासून नरमाई दिसत आहे. बाजारातील शेवगा आवकही मर्यादीत दिसते. पण तरीही पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसताना दिसत आहे.सध्या शेवग्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ७०० ते २ हजार ३०० रुपयांचा भाव मिळतोय. शेवग्याची आवक आणि दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
४) फ्लाॅवरच्या दरात सुधारणा
राज्यातील अनेक बाजारात फ्लाॅवरच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. त्यातच बहुतांशी बाजारांमध्ये फ्लाॅवरची आवक कमी झाली. परिणामी दरात वाढ झाल्याचं व्यापारी सांगत आहेत.राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या मोठ्या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणची आवक सरासरीपेक्षा कमी आहे.त्यामुळे सध्या फ्लाॅवरला सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. फ्लाॅवरच्या दरात पुढील काळात सुधारणा दिसू शकते, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
५) हरभरा बाजार कसा राहील?
देशातील हरभरा बाजारत सध्या काहीसे चढ उतार दिसत आहेत. आज सरासरी गुणवत्तेच्या हरभरा दरात अनेक बाजारांमध्ये क्विंटलमागं ५० रुपयांची नरमाई दिसली. तर चांगल्या गुवत्तेचा हरभरा टिकून आहे. रमजान महिन्याची हरभरा मागणी आता कमी होत आहे.तसचं लग्नसराईसाठी पुढील दोन महिन्यांचाच कालावधी समजला जातो. त्यामुळं उठाव कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यात बाजाराच लक्ष नाफेडच्या खरेदीकडे आहे. नाफेडने आतापर्यंत ८ लाख टन हरभरा खरेदी केला. तर मागील हंगामातील १४ लाख टन हरभरा शिल्लक आहे.
नाफडेची विक्री सुरु झाल्यानंतर बाजारवर दबाव येऊ शकतो, असाही अंदाज व्यक्त केला जातोय. पण यंदाच्या माॅन्सून हंगामात पाऊसमान कसे राहते, यावरही नाफेडची हरभरा विक्री अवलंबून राहील. पाऊसमान कमी राहिल्यास नाफेड कमी विक्री करेल, असंही जाणकारांनी सांगितलं.
सध्या बाजारातील हरभरा आवक कमी आहे. शेतकरी नाफेडला विक्री करण्यासाठी वाट पाहत आहेत. नाफेडची खेरदी बंद झाल्यानंतर बाजारावर आवकेचा दबाव येऊ शकतो, असंही सांगितलं जातं.सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपयांचा भाव मिळतोय. पुढील काळात हरभऱा दरात काहीसे चढ उतार येऊ शकतात, असंही जाणकारांनी सांगितलं.