Onion Market Rate : अकरा गोण्या कांदा विकून उरले 11 रुपये
नगर : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान, त्यात गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्यांच्या केवळ डोळ्यात पाणीच नाही तर शेतकऱ्यांना अक्षरशः रडायला लावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी ११ गोण्या कांदा विकला. ११ गोण्या कांदा विकूनही केवळ ११ रुपये शिल्लक राहिले. घोडेगाव   बाजार समितीत किलोला १ रुपया ४० पैसे कांद्याला दर मिळाला आहे.
राज्यातील नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कृषी विभागाकडे कांदा लागवडीची नेमकी माहिती उपलब्ध केली जात नसली तरी पस्तीस ते चाळीस लाख हेक्टरच्या जवळपास कांद्याचे क्षेत्र असते.
गेल्या दोन वर्षांपासून कांद्याचे क्षेत्र वाढतेच आहे. एकट्या नगर जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले. साधारण एप्रिल-मे हा उन्हाळ कांदा काढणीचा कालावधी असतो.
यंदा मात्र या काळात आठ ते दहावेळा जोरदार अवकाळी पाऊस, गारपीट झाली. त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. कांदा भिजल्याने नुकसान झाले. आपसूकच बाजारात आवक वाढली आणि नेहमीप्रमाणे खरेदीदारांनी दर पाडले.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी बाभूळखेड्याचे अनिल विधाटे यांनी ११ गोण्या कांदा विकला. १ रुपया ४० पैसे प्रती किलो निच्चांकी दर मिळाला. वाहन भाडे, हमाली, मापाई व इतर खर्च वगळून ११ गोण्या कांद्यातून केवळ ११ रुपये शिल्लक राहिल्याची कांदापट्टी संबंधित शेतकऱ्यांला मिळाली आहे.
चार महिने राबून व एकरी साठ हजार रुपये खर्च करून मातीपेक्षाही कमी दराने कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कांदा काढणी, शेतातून घरापर्यंत वाहतूक व इतर बाबी करूनही दराअभावी काहीच पदरात पडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कांदा सोडून दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून कांद्याला एक ते दोन रुपये किलोला दर मिळत आहे. अत्यंत चांगल्या कांद्याला जास्तीत जास्त सहा रुपये किलोपेक्षा अधिक दर नाहीत. मिळणारा दर लाजीरवाणा असल्याने आपल्या बाजार समितीत मिळणारा दर सांगून नामुष्की नको म्हणून काही दिवसापासून बाजार समित्यांनी कांदा लिलावाला मिळणारे दर सांगणेच बंद केले असल्याचे पाहायला मिळत आहेत.
टिकण्याची शक्यता कमीच
नगर जिल्ह्यासह राज्यात उन्हाळ कांद्याची एप्रिल-मे च्या कालावधीत काढणी केली जाते. या काळात बाजारात आवक वाढती असल्याने पुरेसा दर मिळत नाही. त्यामुळे दराच्या आशेने अगदी दिवाळीपर्यंत कांदा साठवून ठेवला जातो.
यंदा मात्र पावसात कांदा भिजल्याने कांदा फार काळ टिकेल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे बाजारात नेल्याशिवाय पर्याय नाही आणि व्यापारी मातीमोल दराने खरेदी करणार हे निश्चित दिसत आहेत.