अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यभर शोककळा; मुंबई APMC मार्किट एक दिवस बंद
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक, सहकार आणि व्यापारी क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून, सर्व स्तरांतून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
आशियातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील बाजार घटकांनीही या दु:खद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर एक दिवसाचा दुःखवटा पाळत एपीएमसी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई एपीएमसीमधील मसाला व धान्य मार्केट आज बंद ठेवण्यात आले असून, उद्या गुरुवार, २९ जानेवारी २०२६ रोजी भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ मार्केट पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती एपीएमसीचे सचिव शरद जरे यांनी दिली.
या निर्णयामुळे उद्या कांदा-बटाटा, भाजीपाला व फळांच्या घाऊक व्यवहारांवर परिणाम होणार असून बाजारातील सर्व व्यवहार ठप्प राहणार आहेत. एपीएमसीतील व्यापारी संघटना, आडते व्यापारी तसेच माथाडी कामगार संघटनांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून, सर्व संबंधितांनी बाजार बंदसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुःखवटा संपल्यानंतर पुढील दिवशी बाजारातील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, बाजार बंद असला तरी अत्यावश्यक सेवा-सुविधांबाबत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी व नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.