जागतिक उत्पादनात ५३ टक्क्यांनी वाढ; खाद्यतेल, मांस, फळ आणि तृणधान्य उत्पादन वाढले
जागतिक पीक उत्पादनामध्ये २००० ते २०१९ दरम्यान ५३ टक्क्यांची वाढ झाली आहे. सिंचन, किटकनाशके, खते आणि मोठ्या प्रमाणातील लागवड क्षेत्र या कारणांमुळे ही वाढ झाल्याचे फूड अॅन्ड अग्रीकल्चर ऑर्गनायजेशन (Food and Agriculture Organization) म्हणजेच एफएओने म्हटले आहे.
२०१९ मध्ये उत्पादित झालेल्या एकूण प्राथमिक पीक उत्पादनात तृणधान्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी आहेत. प्राथमिक पिकांच्या जागतिक उत्पादनात ४९ टक्के वाटा असलेल्या चार वैयक्तिक पिकांमध्ये ऊस अव्वल आहे. एकूण जागतिक प्राथमिक पिकांच्या उत्पादनात उसाचे उत्पादन २१ टक्के आहे, त्यानंतर मका १२ टक्के, तांदूळ आणि गहू ज्यांचा वाटा प्रत्येकी आठ टक्के आहे. जागतिक पीक उत्पादनात ऑईल पाम आणि बटाटे यांचा वाटा प्रत्येकी चार टक्के आहे.
या कालावधित मक्याचे उत्पादन गहू, तांदळाच्या तुलनेत तीन पटीने वाढले आहे. या दोन्ही पिकांचा २००० आणि २००१ मध्ये एकूण पीक उत्पादनात प्रत्येकी १० टक्के वाटा होता. जागतिक स्तरावर मका हे पहिल्या आणि तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाणारे पीक आहे.
जागतिक फळांचे उत्पादन या कालावधीत ५४ टक्क्यांनी वाढून ८८३ दशलक्ष टन झाले आहे. केळी, कलिंगड, सफरचंद, संत्री आणि द्राक्षे या पाच फळांचा एकूण जागतिक उत्पादनात ५७ टक्के वाटा आहे, असे एफएओने म्हटले आहे. २०१९ मध्ये जगभरातील भाज्यांचे उत्पादन ६५ टक्क्यांनी वाढून १.१३ अब्ज टन झाले. या कालावधीत कांदे, काकडी आणि वांगी यांचा वाटा वाढला आहे, तर टोमॅटोचा वाटा स्थिर राहिला आहे, तर कोबीचा वाटा निम्म्यावर आला आहे.
एफएओच्या म्हणण्यानुसार, उसाच्या उत्पादनात अमेरिका आघाडीवर असून जागतिक उत्पादनात अमेरिकेचा वाटा ५२ टक्के आहे. तर मका उत्पादनात ४९ टक्के वाटा आहे. तर तांदूळ उत्पादनात आशिया जागतिक उत्पादनाच्या ९० टक्के वाट्यासह अव्वल स्थानी असून ऑईल पाम ८८ टक्के, गहू ४४ टक्के आणि बटाट्याचा वाटा ५१ टक्के आहे.
जागतिक पिकांच्या उत्पादनाचे आणखी एक वैशिष्ये म्हणजे २००० ते २०१८ दरम्यान खाद्यतेलाचे उत्पादन दुप्पट झाले असून के २०.१ कोटी टन झाले आहे. यामध्ये पाम तेलाच्या उत्पादनात सर्वाधिक वाढ झाली आहे. पाम तेलाचे उत्पादन २२२ टक्क्यांनी वाढून ४.९ कोटी टन झाले आहे. पाम तेलाचा वापर बायोडिझेलसाठी वाढल्याने उत्पादनातील वाढ उल्लेखनीय असल्याचे दिसत आहे. तर मोहरी तेल १२ टक्के आणि सूर्यफूल तेल नऊ टक्क्यांच्या योगदानासह जगभर उत्पादित होणारे इतर मुख्य वनस्पती तेल होते.
जगातील एकूण पाम तेलाच्या उत्पादनापैकी ८५ टक्के उत्पादन इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशात होते. यामध्ये इंडोनेशिया ५७ टक्के आणि मलेशियाचा वाटा २७ टक्के आहे. सोयाबीन तेलाच्या बाबतीत चीन हा जागतिक उत्पादनाच्या २९ टक्के उत्पादन करणारा प्रमुख उत्पादक आहे. तर अमेरिका हा चीननंतरचा १९ टक्के उत्पादनासह दुसरा मोठा उत्पादक आहे. मोहरी उत्पादनात कॅनडा १७ टक्क्यांसह आघाडीवर असून चीन १५ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक सूर्यफूल तेल उत्पादनात युक्रेनचा सर्वाधिक २८ टक्के वाटा आहे. त्यानंतर त्याच्या शेजारील रशियाने एकूण जागतिक उत्पादनाच्या २५ टक्के उत्पादन केले आहे.
२००० ते २०१९ पर्यंत मांसाचे उत्पादन ४४ टक्क्यांनी वाढून ३३.७ कोटी टन झाले आहे. उत्पादनातील एकूण वाढीमध्ये चिकनचा वाटा ५० टक्के आहे. मांस उत्पादनाच्या प्रकारांमध्ये चिकन हा सर्वाधिक उत्पादित मांसाचा प्रकार होता. त्यानंतर गोमांसाचा वाटा सर्वाधिक आहे.
२०१९ मध्ये प्रमाणाच्या दृष्टीने तृणधान्ये ही सर्वाधिक व्यापार झालेली जिन्नस होती. युरोप आणि अमेरिका हे सर्वात मोठे निर्यातदार आणि आशिया हे सर्वात मोठे आयातदार आहेत. ज्यामध्ये युरोप आणि अमेरिका हे सर्वात मोठे निर्यातदार आणि आशिया हे सर्वात मोठे आयातदार होते.
या कालावधित किटकनाशकांच्या वापरामध्ये ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, २०१२ नंतर यामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. कृषी, वनीकरण आणि मासेमारी जागतिक मूल्यवृद्धी ७३ टक्के आहे. मूल्यवृद्धीहीत आशियाचा वाटा ६४ टक्के होता, तर आफ्रिकेचे मूल्यवर्धन या कालावधीत दुप्पट होऊन ४०४ अब्ज डॉलर झाले आहे.