रायगड जिल्ह्यात स्ट्रॉबेरी पाठोपाठ मिरचीचा प्रयोग
केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी गुजरात येथे झालेल्या कृषीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती हेच शेती व्यवसयाचे भवितव्य आहे. त्यादृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही राज्यांनी नैसर्गिक शेतीचे नियोजन आणि कार्यपध्दतीही ठरवलेली आहे. महाराष्ट्राने याबाबत अद्यापही कोणतेही धोरण ठरवले नसले तरी अलिबागच्या सचिन बैकर या तरुण शेतकऱ्याने केलेला सेंद्रीय शेतीचा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.अडीच गुंठ्यातच त्याने मिरचीचे उत्पादन घेतले असले तरी यामध्ये रासायनिक खताचा वापर नाही तर लागवड ते काढणीपर्यंत सेंद्रीय पध्दतीचा अवलंब केला आहे. शेतीक्षेत्र अधिकचे असले तरी केवळ अडीच गुंठ्यातच त्याने हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्याच्या गावरान मिरचीचा ठसका अनुभवण्यासाठी आता जिल्हाभरातील शेतकरी बांधावर येत आहेत.
अशी झाली सुरवात
असंख्य तरुणांप्रमाणे सचिन बैकर हा देखील पुणे येथील एका कंपनीमध्ये जॉब करीत होता. मात्र, 12 एकर शेतीमध्ये अनोखा प्रयोग करावा हा त्याचा मनसुबा होता. नागझरी या गावी परतल्यानंतर शेतामध्ये त्याने एक ना अनेक पीके घेतली. सुरवातीला आंबा, भाजीपाला, चारा पीके अशा विविध पिकांचा प्रयोग केला. मात्र, सेंद्रीय शेतीचे महत्व हे निराळेच. आजही गावराण शेतीमालालाच अधिकची मागणी म्हणून त्याने सेंद्रीय पध्दतीने मिरचीचे उत्पादन घेण्याचा निर्धार केला होता. अनेक पिकांची लागवड आणि अभ्यास झाल्यानंतर त्याने मिरची उत्पादनाचा प्रयोग केला ज्याचे कौतुक आता पंचक्रोशीत होत आहे.
सेंद्रीय खताची निर्मिती अन् मिरचीला डोस
उत्पादन वाढीसाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. मात्र, सचिनने सेंद्रीय खताचा निर्मिती केली आणि याचाच डोस मिरचीला दिला आहे. कुक्कुटपालन करताना काही पक्षी हे मरतात. हे मृत पक्षी, खराब अंडी, शेण, गोमूत्र आणि गूळ याचे मिश्रण करुन एका ड्रममध्ये साठवून ठेवले. अवघ्या काही दिवसांमध्ये सेंद्रीय खताची निर्मिती झाली. चार-पाच दिवसांच्या फरकाने मिरचीसाठी बनवलेल्या वाफ्यामध्ये पाटाच्या पाण्याद्वारे सेंद्रीय खत सोडण्यात आले. या दरम्यानच्या काळात त्याने रासायनिक खताचा वापरच केला नाही. या अडीच गुंठ्यामध्ये 300 किलो मिरचीचे उत्पादन झाले आहे.
कीडीपासून संरक्षणासाठी योग्य नियोजन
मिरचीला कीड-रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या क्षेत्राच झेंडूच्या फुलांची लागवड केली. त्यामुळे मिरचीवर नाही तर फुलावरच कीड बसली गेली. अशाप्रकारे कीडीपासून संरक्षण करण्यात आले आहे. मिरचीचे सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतल्यामुळे तोडणीनंतर मिरची किमान आठ दिवस तरी सुकत नाही. आतापर्यंत सचिनने तीन वेळा काढणी केली असून 300 किलो उत्पादन मिळाले आहे. एका झाडाला किमान अर्धा किलो मिरच्या लगडत आहेत. त्याचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.