केळीचे दर वधारले; हताश शेतकरी प्रफुल्लित
केळी तसे बारमाही घेतले जाणारे फळपीक आहे. सर्वच हंगामात केळीची लागवड केली जाते. पण यंदाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी बागांचे नुकसान तर झालेच पण केळी उत्पादक शेतकऱ्यांची खरी अडचण झाली ती घटत्या दरामुळे. मध्यंतरी तर ३ ते ४ रुपये किलोनेही खरेदीदार केळी घेत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी थेट बागेची तोडणी करीत इतर पिकांचा पर्याय शोधला. निसर्गाचा लहरीपणा त्यामध्ये घटते दर यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडत होती. पण आता हळूहळू का होईना चित्र बदलत आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या खानदेशात आवक घटली असल्याने केळाचे दर ७ ते ८ रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे काढणी झालेल्या आणि सुरु असलेल्या शेतकऱ्यांना या वाढीव दराचा फायदा होणार आहे.
चांगल्या प्रतिच्या केळीला ८०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. गेल्या काही महिन्यातील हा सर्वात चांगला दर असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मध्यंतरीच्या वातावरणातील बदलामुळे केळी बागावरही विपरीत परिणाम झाला होता. मात्र, आता दरात सुधारणा होत असून फेब्रुवारी महिन्यापासून केळीची निर्यातही सुरु होणार आहे. मध्यंतरीचा काही काळ वगळता आता पुन्हा केळीच्या दर वाढीसाठी चांगला काळ राहणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय निर्यातीमध्ये अधिकचा दर मिळणार असल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हे फायदेशीर राहणार आहे.
फळबागांचे गणित हे वातावरणावरच अवलंबून आहे. यापूर्वी वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा द्राक्ष आणि आंबा बागांवर झाला होता. तर वाढत्या थंडीमुळे केळी बागांचेही मोठे नुकसान तर झालेच पण थंडीमुळे केळीच्या दरावरही परिणाम होता. थंडीत मागणीच नसते. आता थंडी कमी होऊन तापमानात वाढ होत आहे. त्याचा फायदा हा केळी उत्पादकांना होणार आहे. एकंदरीत ऐन काढणीच्या दरम्यान केळीच्या दरात वाढ होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.