कापसाची दरवाढ सुरूच; भाव १० हजारी पार करण्याची शक्यता
यंदा कापसाच्या क्षेत्रात कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. परिणामी बाजारात कापसाची आवक कमी असल्याने दिवसेंदिवस दरवाढ पहायला मिळत आहे. विविध कारणांमुळे कापसाच्या क्षेत्रात कमालीची घट झाल्याचा परिणाम उत्पादनावर बघायला मिळत आहे. मात्र यंदा कापसाला चांगलाच विक्रमी दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. सुरुवातीला कापसाला दहा हजाराच्या घरात बाजारभाव मिळत होता. पुन्हा अवकाळी पाऊसाने पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय कापसाची मागणी कमी झाली होती.
तसेच कापूस निर्यातीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणी येत होत्या, या एकंदरीत समीकरणामुळे मध्यंतरी कापसाच्या दरात घसरण पहायला मिळाली. मात्र, आता कमालीची दरवाढ झाल्याने कापसाला झळाळी प्राप्त होताना दिसत आहे. कोरोना आटोक्यात आल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढल्याने परत एकदा कापूस दहा हजाराच्या घरात जाताना दिसत आहे. सध्या कापसाला नऊ हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे, असे असले तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे आता कापूस शिल्लक नाही त्यामुळे वाढलेल्या दराचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.
जालना जिल्ह्यात देखील कापूस लागवड लक्षणीय बघायला मिळते, मात्र यंदा जालना जिल्ह्यातील कापूस लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याचे आढळले आहे. यंदा जालना जिल्ह्यात फक्त ५ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड बघायला मिळत आहे, म्हणजेच जवळपास २२ हजार हेक्टर कापसाचे क्षेत्र कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड, जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, घनसावंगी या प्रमुख कापूस उत्पादक तालुक्यात २ लाख ९ हजार हेक्टरवर कापूस लागवड बघायला मिळत आहे. या आठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी इतर पिकांपेक्षा कापसाच्या लागवडीला जास्त प्राधान्य दिल्याचे बघायला मिळाले.
एकंदरीत सध्या मिळत असलेला कापसाच्या दरामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच कापसाला चांगला बाजारभाव प्राप्त होत असल्याने आणि भविष्यात ही दरवाढ अजून वधारणार या आशेने कापूस उत्पादक शेतकरी अजूनही विक्री करण्यापेक्षा साठवणुकीवर भर देताना दिसत आहेत. यावर्षी लॉन्ग स्टेपलच्या कापसाला सुमारे ६ हजार २५ रुपये हमीभाव देण्यात आला होता, मात्र यावर्षी हंगामाच्या आधीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा कितीतरी अधिक बाजार भाव प्राप्त झाला आहे. कापसाला जरी विक्रमी दर प्राप्त होत असला तरी कापूस उत्पादक शेतकरी विशेष आनंदी दिसत नाही. त्याचे प्रमुख कारण असे की यंदा हलक्या जमिनीत लावला गेलेला कापूस दोन वेचणीतच रिकामा झाला, तसेच यंदा कापसाला चांगली वाढ जप्त नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत, तसेच अनेक कापूस उत्पादक शेतकरी कापूस उत्पादनावर संकट आल्याने परेशान झाले आहेत.
आता अनेक कापूस उत्पादक शेतकरी कापसाची उचलबांगडी करून त्या जमिनीवर हरभरा, गव्हाची लागवड करत आहेत. यंदा कापसाला दिवाळीनंतर लॉटरी लागली आणि भाव चांगलाच वधारला, मध्यंतरी कापूस आठ हजारावर जवळपास महिनाभर स्थिरावला होता, मात्र आता कापसाने परत कमबॅक करत नऊ हजाराचा पल्ला गाठला आहे. तसेच कापसाला खाजगी बाजारपेठेत उच्चांकी दर मिळत असल्याने यंदा पणन महासंघ कापूस खरेदी करणार नाही असे सांगण्यात येत आहे.
एकीकडे कापसाला उच्चांकी दर प्राप्त होत आहे तर दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच लूटमार नजरेला पडत आहे. अनेक कापूस उत्पादक शेतकरी आपला कापूस गावातील व्यापाऱ्यांना विक्री करतात, त्यामुळे गावातील व्यापारी त्यांची लूटमार करताना दिसत आहेत. तर कापसाच्या दरवाढीमुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी प्रसन्न आहेत आणि चांगला मोठा नफा कमवित आहेत. तसेच अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन कमी असल्याने दरवाढीमुळे देखील फायदा मिळालेला नाही. कापूस खरेदी करणारे व्यापाऱ्यांच्या मते अजून काही दिवसात कापसाला पाचशे रुपयांपर्यंत दरवाढ अपेक्षित आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होल्डिंग कपॅसिटी देखील मजबूत झाली आहे. त्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असे दिसत आहे.