ऊस उत्पादक शेतकरी हैराण; अवकाळी पावसाचा फटका
राज्यातील काही नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाल्यापासून शेतकरी उसाचे नगदी पीक घेत आहेत. यंदाही राज्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र ऊस तोडणीसाठी तयार असताना त्याला तुरे फुटल्याने वजनात घट येत असून शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ऊस पोकळ होऊन उत्पन्नात २० ते २५ टक्क्यांनी घट येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा ऊस पडला आहे. चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील सुमारे १ हजार हेक्टर ऊस आडवा झाला आहे. अशातच उसाला तुरे आल्याने त्याची वाढ खुंटली आहे. साखरेचे प्रमाण कमी होण्यासह उसाचे वजन कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.
नदीकाठापासून माळरानापर्यंतच्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून थेट पाणी योजना राबविल्या आहेत. पण दरवर्षी उसाला मिळणारा कमी-जास्त दरामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे. तरीही दराअभावी शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यंदा बहुतांश कारखान्यांनी दरही घोषित केलेला नाही. एकंदरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी होताना दिसत आहे.
निपाणी भागातील सर्वच उसाला गेल्या आठवड्यापासून तुरे आले आहेत. ऊस तोडणीनंतर जनावरांना चारा म्हणून वाढे वापरले जाते. पण त्याला तुरे आल्याने जनावरांच्या चाऱ्याची अडचण निर्माण झाली आहे. बदलते वातावरण, अतिवृष्टी व विविध कारणांनी यंदा उसाला तुरे आले आहेत. परिणामी उसाचे उत्पादन घटून शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडणार आहे. त्यासाठी कारखानदारांनी योग्य दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.'