मोसंबी शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने खरेदी ; ग्राहकांना मात्र चढ्या दरानेच विक्री
दरवर्षी इतर फळपिकांच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच असतो. मोसंबीचे दर मात्र नेहमीच चढेच राहिलेले असतात. यंदा मात्र, बदलत्या वातावरणाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. टनामागे तब्बल ४० ते ५० हजार रुपयांची घसरण झाली आहे. वातावरण बदल्याने मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचाच परिणाम दरावर झाला असून व्यापाऱ्यांनी मागेल त्या दरात फळबागा देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. केवळ ५ ते १५ हजार रुपये प्रतिटनाने मोसंबीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे उत्पन्न पाहता हंगामी कापूसच बरा असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
गेल्या ८ ते १० वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई असताना शेतकऱ्यांनी टॅंकरच्या पाण्यावर बागा जोपासल्या होत्या. तर अनेकांनी बागाची मोडणीही केली होती. आता गेल्या वर्षीपासून अधिकच्या पावसामुळे या बागांना फायदा होण्याऐवजी अधिकचे नुकसानच होत आहे. हलक्या प्रतिच्या जमिनीवरील बागेला या पावसाचा फायदा झाला आहे. पण चांगल्या प्रतिच्या जमिनक्षेत्रावर पावसाचे पाणी अधिकचे काळ राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे.
चार महिन्यांपूर्वी मोसंबी ५० ते ५५ हजार रुपये प्रतिटन विकली जात होती. मोसंबीला विक्रमी दर मिळाल्यामुळे पुन्हा बागांना शेतकऱ्यांनी नवसंजीवनी देत दुप्पट उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निसर्गाचा लहरीपणा पाहून पुन्हा मोसंबीचे क्षेत्र घटणार असे चित्र आहे. दक्षिण भारतामधून मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मोसंबीला मागणीच राहिलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांनाच बाजारात बसून विक्री करावी लागत आहे.