सोयाबीन प्रमाणेच तुरीच्या नुकसानीची मिळेल का भरपाई, शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे!
नवी मुंबई : निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना भरपाईचा मोठा आधार मिळालेला आहे. मात्र, ज्या प्रमाणात नुकसान होते आणि मिळत असलेल्या भरपाईची तुलना होऊ शकत नसली तरी बुडत्याला काडीचा आधार असाच काही प्रकार सुरु आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हे पाण्यातच होते तर आता अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच वाशिमचे जिल्हाधिकारी यांनी नुकसानीचा आढावा घेतल्याने नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत. मात्र, सराकार काय निर्णय घेणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे.
जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील 50 टक्के पिकांचे नुकसान
अवकाळी पावसाने नुकसान होताच कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिकपाहणी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील पिकांचे जवळपास 50 टक्के असे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. त्याच अनुशंगाने आता जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतल्याने नुकसानभरपाईबाबत काय निर्णय होणार का याबाबत शेतकऱ्यांच्या मनात विचार आहेत. 50 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले तर पंचनामा करुन शेतकऱ्यांच्या भरपाईचा मार्ग मोकळा होणार आहे. पण याबाबत कोणताही निर्णय झाला नसून शेतकऱ्यांच्या नजरा आता प्रशासनाकडे लागल्या आहेत.
तुराचे पीक दुहेरी संकटात
खरीप हंगामातील प्रत्येक पिकावर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. यामधून तूर पिकाची सुटका होते की काय अशी परस्थिती असतानाच ऐन काढणीच्या काही दिवस अगोदरच झालेल्या अवकाळी पावसामुळे थेट शेंगाचेच नुकसान झाले होते. तर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे तूर पीकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला होता. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे पण पाऊस आणि रोगराईने 50 टक्के पेक्षा अधिकचे नुकसान झाले असून आता भरपाईची मागणी विमा कंपन्याकडे केली जात आहे.
उडीद-मूगाबाबत शेतकरीही संभ्रम अवस्थेत
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. मात्र, आता पर्यंत शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन आणि कापसाच्याच नुकासनीची भरपाई मिळालेली आहे. तुरीच्या नुकसानीबाबत निर्णयही होईल पण उडीद आणि मूगाबाबत विमा कंपन्यांनी काय निर्णय घेतला आहे हे अद्यापही समोर आलेले नाही. त्यामुळे मदत मागावी तरी कोणाकडे अशी अवस्था झाली आहे. उडीद-मूगाबाबत ना कृषी अधिकारी सांगत आहेत ना विमा कंपनीचे प्रतिनीधी. त्यामुळे विमा कंपनीबाबत शेतकऱ्यांचा विश्वास कमी होत जात आहे.