थंडीचे अनेक फायदे, अवकाळीचा मात्र धोकाच, कसा होतो पिकांवर परिणाम? वाचा सविस्तर
नवी मुंबई : सध्या हिवाळ्यात (Change in environment) पावसाळ्याची अनुभती येत आहे. दर पंधरा दिवासाला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे फळबागा तसेच दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. तर गुलाबी थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमात होत असून आंबा बागांना मोहरही बहरत आहे. एवढेच नाही तर वाढत असलेल्या थंडीमुळे साखरेचा नैसर्गिक उतारही वाढतो. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या या वातावरणामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ अशीच अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी एक ना अनेक पर्याय अवलंबले तरी गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पीकाचे नुकसान हे ठरलेलेच अशीच अवस्था आहे. मात्र, सध्याच्या अवकाळी पावसामध्येही गारठा टिकून असल्याने आंब्याचा मोहर अणखीन फुलेल अशीच आशा व्यक्त केली जात आहे.
रब्बी पिकांबाबत कहीं खुशी कहीं गम…
राज्यात रब्बी हंगामाचा पेरा होऊन महिन्याभराचा कालावढी लोटलेला आहे. मुबलक पाणी आणि पोषक वातावरणामुळे ज्वारी, गहू, हरभरा, सुर्यफूल, राजमा या पिकांची जोमात वाढ झाली आहे. राजमा आणि हरभरा ही पिके फुलोऱ्यात असतानाच गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीची पडझड झाली आहे तर हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसरीकडे राजमा आणि सुर्यफूल यांची वाढ झाली नसल्याने या पिकांना धोका नाही पण पावसामध्ये सातत्य राहिले तर मात्र, परिणाम होणार आहे.
आंब्याचा मोहर बहरला
मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा पिकाचा मोहर गळाला होता. आंबा पिक दुसऱ्या टप्प्यात असतानाच मोहर गळती झाल्यामुळे उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या होत्या. पण वाढत्या थंडीमुळे पुन्हा मोहर बहरत आहे. त्यामुळे उशिरा का होईना पण आंबा लागवडीस सुरवात होणार असा आशावाद फळबागायतदार शेतकऱ्यांना आहे. थंडीमुळे पोषक वातावरण झाले आहे तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागलेला आहे.
साखरेच्या उताऱ्यामध्ये नैसर्गिक वाढ
डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे खालावलेला साखरेचा उतार पुन्हा वाढत आहे. वाढत्या थंडीमुळेच हा बदल होत आहे. अवकाळी पावसामुळे साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले होते. अपरिपक्वच ऊस हा गाळपासाठी कारखान्यावर दाखल होत होता. यामुळे साखर उताऱ्यात सरासरी 1 टक्क्याची घट झाली होती. आता 8 ते 10 दिवसांपासून विशेषत: ऊसाच्या पट्ट्यामध्ये थंडीत वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी पारा हा 15 अंश सेल्सिअसपर्यंत आलेला आहे. याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यावर झालेला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील ऊसही आता साखर कारखान्यावर दाखल होत आहे.